Breaking News

तंबाखूमुक्त शाळा परिसर योजनेचा बोजवारा! नशील्या पदार्थांची जोरदार विक्री


राज्य शासनाकडून तंबाखूजन्य व सिगारेट उत्पादने अधिनियम २००३ हा राष्ट्रपतींच्या सहीद्वारे कायदा लागू करण्यात आला. या कायद्यात वेळोवेळी सुधारणाही करण्यात आल्या. त्यानुसार प्राथमिक, माध्यमिक शाळेपासून १०० यार्ड परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई आहे. परंतु ग्रामीण भागात हा कायदा पायदळी तुडविला जात आहे. परिणामी तंबाखूमुक्‍त शाळा परिसर योजनेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. विविध ठिकाणच्या शाळांच्या परिसरात तंबाखू, गुटखा, मावा अशा नशील्या पदार्थांची जोरदार विक्री सर्रासपणे विक्री सुरु आहे. 

भावी पिढीवर सुसंस्कार व्हावेत आणि यातून भविष्यातील जबाबदार आणि निर्व्यसनी समाज निर्माण होईल, यासाठी प्रत्येक पालक आपल्या लाडक्या मुलामुलींना शाळेत पाठवितो. त्यानुसार शिक्षकदेखील या मुलामुलींवर प्रामाणिकपणे संस्कार करण्यासाठी धडपडतात. मात्र शाळेच्या बाहेरच पान, मावा, गुटखा, सिगारेट आसि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असेल तर पालकांचे स्वप्न आणि शिक्षकांचे कष्ट दोघांचीही राखरांगोळी होते. वास्तविक पाहता शाळा परिसर तंबाखूमुक्त करण्याकरिता कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना शाळांना करण्यात आल्या आहेत. मात्र बहुतांशी ठिकाणी या कायद्याला केराची टोपली दाखवली जात आहे. अनेक शाळा नियमांना तिलांजली देत आहेत. कायद्याच्या उद्दिष्टाप्रमाणे तंबाखूसेवनापासून संरक्षण देऊन नवी पिढीही तंबाखूपासून दूर राहावी, यासाठी उपाययोजना करण्याकरिता कायदा अमंलात आणलेला आहे. याकरिता राज्य, जिल्हा व तालुकास्तरावरील यंत्रणा तसेच केंद्रप्रमुखांना याच्या अंमलबजावणीच्या सूचनाही वेळोवेळी करण्यात आलेल्या आहेत. मात्र ग्रामीण भागात याबाबत अद्यापही गांभीर्य नसल्याची स्थिती आहे. तंबाखूबंदीबाबत सूचना फलक लावणे बंधनकारक असताना अनेक शाळांकडून मुख्य प्रवेशद्वाराजवळ असे कोणतेही फलक लावण्यात आलेले नाहीत. याउलट अनेक शाळांबाहेर तंबाखूजन्य पदार्थांची सर्रास विक्री केली जात आहे.

तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर, एरिथोप्लेनिया, फायब्रेसिस आदी शारीरिक दुष्परिणाम होत आहेत. त्यामुळे याबाबत ग्रामीण भागात जनजागृती होणे गरजेचे आहे. तंबाखूविरोधात लोकजागृतीची चळवळ उभारल्यास भावी पिढी निर्व्यसनी होईल. याची सुरुवात शाळांपासूनच होणे गरेजचे आहे. याकरिता शाळेत तंबाखू नियंत्रण समिती स्थापन करण्याचे शासनाचे आदेश आहेत. मात्र हे आदेश पाळणाऱ्या शाळांचे प्रमाण कमीच आहे. शासनाच्या तंबाखू नियंत्रण मोहिमेच्या माध्यमातून आपली शाळा तंबाखूमुक्‍त करण्यास मुख्याध्यापक व शिक्षकांनी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केल्यास तरुण पिढी या व्यसनांपासून दूर राहण्यास मोठी मदत होऊ शकते.