Breaking News

महात्मा फुलेंच्या जयंती आगोदर पुतळा परिसर स्वच्छ करण्याची मागणी

श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी / - 11 एप्रिल रोजी समाजसुधारक महात्मा फुले यांची जयंती होत असताना, येथील रेल्वेस्टेशन लगतच्या परिसरात असणार्‍या समाजसुधारक महात्मा फुले यांच्या पूतळ्याभोवती सर्वत्र अस्वच्छता झाली आहे. शेकडो लोक महात्मा फुलेंना अभिवादन करण्यासाठी येत असतात. जयंतीपूर्वी तरी पुतळ्यासभोवतालचा परिसर नगरपालिका स्वच्छ करणार का असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.


शहरामध्ये रेल्वेस्टेशनजवळ महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा असून तेथे सर्वत्र अस्वच्छता आहे. सगळीकडे गवत वाढले असून शोभेची झाडेही पाण्याअभावी सुकत आहेत. पुतळ्यांभोवतालचा परिसर पालिकेने नियमित स्वच्छ करणे आवश्यक असताना पालिका तो करत नाही. पुतळ्यालगत सर्वत्र गवत वाढले आहे. शोभेची झाडेही वाळून गेली आहेत. पुतळ्यालगतच्या परिसरात फुलझाडे लावून त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. सध्या तेथे केवळ लिलीच्या फुलांचे झाडे असून पाण्याअभावी तेही वाळून जात आहेत. महात्मा फुलेंच्या जयंती आगोदर पुतळा परिसर स्वच्छ करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.