Breaking News

खेड, राशीन, भांबोरा भागात अवकाळीने पिकांचे नुकसान

कर्जत तालुक्यातील खेड, राशीन, बारडगाव, भांबोरा, चिलवडी, धालवडी, सिध्दटेक भागात काल मेघगर्जनेसह झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले. दुपारी चार वाजता अचानक सुरू झालेल्या पावसाने राशीनला बाजारकरूंची मोठी तारांबळ उडाली.

राशिन परीसरात विजांच्या गडगडाटासह झालेल्या पावसाने शेतातील कांदा, चारा पिके भुईसपाट झाली. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. खेड येथे पाडाला आलेल्या आंबा पिकाचा सडा पडला. बारडगाव, सिध्दटेकला अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान केली आहे. सुमारे तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे उकाड्यापासुन काहीकाळ आराम मिळाला असला तरी अचानक झालेल्या वादळ वार्‍यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कुळधरण भागात रिमझिम पाऊस झाला. सुसाट्याच्या वार्‍याने अनेक झाडे उन्मळून पडली.दुरगावमध्ये अवकाळी पावसाने पिकाचे तसेच विटभट्ट्यांचे नुकसान झाले. निसर्ग जगू देत नाही व शासन मरू देत नसल्याची प्रतिक्रिया खेडचे विराज मोहिते यांनी दिली.