Breaking News

महाराष्ट्राने संपूर्ण जगाला समतेची शिकवण दिली - मिटकरी

कर्जत / प्रतिनिधी । 11 - छ.शिवाजी महाराज, क्रांतीज्योती फुले, महामानव डॉ. आंबेडकर यांच्या सारख्या महापुरुषांची भूमी म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्राने फक्त देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला समतेची शिकवण दिल्याचे प्रतिपादन शिवव्याख्याते अमोल मिटकरी यांनी व्यक्त केले.
क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिनव युवा प्रतिष्ठाण व भास्कर भैलुमे मित्र मंडळातर्फे अमोल मिटकरी यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वांनी एकत्र या व जातीयतेच्या भिंती गाडून टाका असे आवाहन विविध महापुरुषांनी करताना आपल्या कृतीतूनही स्त्रीयांचा आदर व त्यांना समानतेची वागणूक दिली. छ. शिवाजी महाराजानी शिका, योग्य न्याय द्या, व सर्वत्र जिंका असा संदेश दिला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका संघटीत व्हा व संघर्ष करा असा संदेश दिला. याबाबत विविध उदाहरणे देऊन सर्वांना चिंतन करण्यास भाग पाडले.
शिवश्री अमोल मिटकरी यांचा व्याख्यानाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने कर्जत बाजारतळ येथे पार पडला, यावेळी कार्यक्रम संपल्यानंतर सर्व मुस्लिम समाज बांधवांच्यावतीने अमोल मिटकरी यांचा सत्कार केला. यावेळी धनंजय लाढाने, भास्कर भैलुमेसह उपस्थितांमध्ये कर्जत शहरातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.