Breaking News

जामगावमध्ये मळगंगा देवी यात्रोत्सवाची धूम


पारनेर तालुक्यातील जामगाव येथे सालाबादप्रमाणे ग्रामदैवत मळगंगा देवी यात्रोत्सव मंगळवारी (दि.03) असून यात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. यावर्षी 1 कोटी रूपये खर्च करून मंदिर जिर्णोध्दाराचे काम पूर्णत्वास गेले आहे. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. यावर्षी गावकर्‍यांसह भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
 
जामगाव येथे ऐतिहासिक वारसा असलेल्या महाराजा महादजी शिंदे यांच्या काळात मळगंगा देवीची स्थापना करण्यात आल्याचे बोलले जाते. यावर्षी मंदिर जिर्णोद्धारानंतर पुरातन मुर्तीचे निघोजच्या कुंडामध्ये विसर्जन करुन नवीन मुर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या यात्रेला पुरातन परंपरा आहे. गावातील तरूणांनी अनवाणी पायी चालुन कावडीने आणलेल्या पैठणच्या नाथसागरातील पवित्र पाण्याने मळगंगा देवीला अभिषेक करून पूजा व आरती केली जाते. तसेच सर्व मंदिरांतील देवतांची पुजा करण्यात येते. यावर्षी 15 तरूणांनी नाथसागरातून पवित्र जल आणून अभिषेक केला. शनिवारी शेकडो महिलांनी मळगंगा देवीला हळद लावली. त्यानंतर यात्रेस प्रारंभ होतो. बाहेरगावी असलेले गावकरी दरवर्षी यात्रेला आवर्जुन हजेरी लावतात. यात्रेत वादाचे प्रसंग टाळण्यासाठी पोलिसांना मानधनापोटी काही तासांचे 9 हजार रुपये देऊन सुरक्षा ठेवल्याची परंपरा मागिल वर्षीपासून सुरू झाली. यावर काही ज्येष्ठ नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

यात्रेतील उत्साहवर्धक वातावरण
जामगावच्या ग्रामदैवत मळगंगा यात्रेची तरूणांपासून अबालवृध्दांना प्रतिक्षा असते. यात्रेच्या दिवशी सकाळी कलश मिरवणूक व सायंकाळी छबीना मिरवणुकीत तरूण सहभागी होतात. यावर्षी किर्ती देशमुख प्रस्तुत नखरेल नारी या ऑर्केस्ट्राच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राजकीय मंडळी सर्व मतभेद विसरुन यात्रोत्सवाच्या नियोजनासाठी एकत्र येतात. यात्रोत्सवाचा लाभ घेण्याचे आवाहन यात्रोत्सव कमिटी, सप्ताह कमिटीकडून करण्यात आले आहे.