खांडवी गावची काळभैरवनाथांची यात्रा उत्साहात
ग्रामीण भागातील ग्रामदैवतांच्या यात्रा या उन्हाळ्यामध्ये असतात. त्यातल्या त्यात ग्रामीण भागात पूर्ण वर्षभर काबाड कष्ट करणार्या शेतकर्यांना गावची यात्रा म्हणजे एक मोठा उत्सव असतो. त्याचबरोबर गावातील तरूणाईसाठी गावची यात्रा म्हणजे तर एक वेगळीच मजा असते. काल परवा झालेल्या हनुमान जयंतीच्या दिवशी विविध ठिकाणच्या यात्रा असतात. गावच्या यात्रसाठी नागरिक राज्यासह देशातील कोणत्याही कानाकोपर्यात असतील तरीही ते यावेळी गावची वाट धरून गावाकडे येतात. गावाकडचे मित्र एकत्र येतात, आपल्या सुख दूःखाच्या गुजगोष्टी करतात.
त्याचबरोबर कर्जत तालुक्यातील कोंभळी पंचक्रोशीतील खांडवी, कौडाणे या गावांची यात्रा ही हनुमान जयंतीच्या दिवशी असते. गावातील नागरिक आणि तरूण पैठण तसेच मांडवगण येथून ग्रामदैवतांसाठी अणवाणी पायाने कावडीच्या माध्यमातून पाणी घेवून येतात. मोठ्या दिमाखात सवाद्य वाजत गाजत कावडींचे स्वागत करून यात्रोत्सवास प्रारंभ होतो. त्यानंतर ग्रामदैवत असलेल्या काळ भैरवनाथांना कावडीने आणलेल्या पाण्याने जलाभिषेक केला जातो. काही वेळानंतर गावकर्यांच्या शेरणी वाटपाचे कार्यक्रम दिवसभर चालतात. सायंकाळी पालखीचा छबीणा संपूर्ण गावास प्रदक्षिणा घातली जाते. तरूणांसाठी डिजे तसे पालखीसमोर पारंपारिक सनई, ढोल,ताशांच्या गजरात छबीणा मध्यरात्रीपर्यंत चालतो. त्याचबरोबर गावाकडे पाहुण्या मंडळींसाठी लोकनाट्य तमाशाची पर्वणी असते. यात्रोत्सवाच्या दुसर्या दिवशी तमाशाच्याच हजर्या नावाचा एक प्रकार असतो. त्याचबरोबर सायंकाळी कुस्त्यांचा फड असतो. तालुक्यातून तसेच जिल्ह्याभरातून याठिकाणी मल्ल कुस्त्या करण्यासाठी येतात. सकाळी यात्रेचा बाजार यात्रोत्सवासाठी गावातील यंत्रणा बर्याच दिवसांपासूनच कार्यरत असते. यात्रोत्सवाच्या अनुशंगाने संपूर्ण ग्रामदैवतांचे मंदिर तसेच गाव प्रकाशमय करून टाकले जाते.