Breaking News

अ‍ॅन्यूटीच्या हायब्रीड बेण्याला हायप्रोफाईल भ्रष्टाचाराचे पाठबळ


 श्रीनिवास जाधव, सी. पी. जोशी केंद्रस्थानी  23 हजार कोटीचा गफला  वरळी प्रकरणी सुर्यवंशीवर निलंबनाची तलवार
 मुंबई/विशेष प्रतिनिधी । 08 :
छगन भुजबळांच्या कार्यकाळात बिओटीने राज्यातील रस्त्यांची अन् छगन भुजबळांच्या राजकीय अस्तित्वाचीही वाट लावली, त्या बिओटीला पर्याय म्हणून हायब्रीड अ‍ॅन्यूटीचे बारसे घालणार्‍या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मती भ्रष्ट कारभाराने राज्य सरकारचे श्राध्द घालण्याची सुपारी घेतल्याचा आरोप आ. चरणभाऊ वाघमारे यांनी केला आहे. तब्बल 23 हजार कोटीच्या घोटाळ्याशी संबंधीत या हायब्रीड अ‍ॅन्यूटीच्या उद्याला बांधकाम बांधकाम मंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव, बांधकाम सचिव सी. पी. जोशी, मराठवाडा साबां विभागात भ्रष्टाचार प्रकरणातील मास्टर माईंड धोंडगे आणि गैरव्यवहाराच्या आरोपावरून लवासातून हद्दपार झालेला इंटरनेटचा व्यसनी आचार्य यांचे भ्रष्ट हितसंबंध कारणीभूत असल्याचे खात्रीशीर पुरावे उपलब्ध झाले आहेत. दरम्यान आ. चरणभाऊ वाघमारे यांनी वरळी अपहार प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात कुचराई केली म्हणून अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांना निलंबीत करण्याच्या आ. वाघमारे यांच्या मागणीला बांधकामचे प्रधान सचिवांनी हिरवा कंदिल दाखवून तसे आदेश मुख्य अभियंत्यांना दिल्याचे वृत्त आहे.
बांधा वापरा आणि हस्तांतरीत करा, या बिओटी योजनेत झालेला गैरव्यवहार राज्यातील रस्त्यांची दुरावस्था करण्यास कारणीभूत ठरली. या योजनेतील अपहारामुळे तत्कालीन साबां मंत्री छगन भुजबळ यांचे राजकीय अस्तित्व आज शुन्य बनले आहे. राजकीय नेते आणि शासकीय निधीचे वाटोळे करण्यास निमित्त ठरलेली बिओटी साबां अभियंत्यांना मात्र लाभदायक ठरली आणि म्हणूनच बिओटीचे अत्याधुनिकरण करून साबांतील भ्रष्टाचारात तज्ञ असलेल्या मंडळींनी हायब्रीड अ‍ॅन्यूटी नावाची नवी योजना राज्यातील रस्त्यांवर आणण्याचा अट्टाहास केल्याचा आरोप आ. चरणभाऊ वाघमारे यांनी केला आहे. आ. चरणभाऊ वाघमारे हे भाजपाचे तुमसर विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करीत असून मुख्यमंत्र्यांच्या गोटातील निष्ठावंत म्हणून ओळखले जात असल्याने त्यांनी केलेला आरोप आणि आरोपाच्या अनुषंगाने दि. 12 सप्टेंबर 2017 रोजी त्यांची मुख्यमंत्र्यांकडे दाखल झालेली तक्रार साबांतील या हायप्रोफाईल भ्रष्टाचाराचा कोथळा बाहेर काढण्यास कारणीभूत ठरली आहे.
लोकमंथनने या तक्रारीचा पाठपुरावा केल्यानंतर हायब्रीड अ‍ॅन्यूटी नावाचे भ्रष्टाचाराचे नवे बेणे साबांने लावण्याचा नतदृष्टपणा केल्याची खळबळजनक माहीती हाती आली आहे. या हायब्रीड अ‍ॅन्यूटी प्रकरणात साबांतील मोठे मासे सहभागी असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
भुजबळ यांच्या कार्यकाळात साबांचा कार्यभार पाहणारे पाहणारे मलिकनेर यांनी तत्कालीन बांधकाम सचिव आणि विभागीय, क्षेत्रिय अभियंत्यांना हाताशी धरून बिओटीला वापरले. त्याच धर्तीवर विद्यमान बांधकाम मंत्र्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव हे बांधकाम सचिव सी. पी. जोशी यांच्याशी संगनमत करून अन्य विभागीय, क्षेत्रिय अभियंत्यांचा वापर अ‍ॅन्यूटीचे हायब्रीड बेणे साबांत रूजवून भ्रष्टाचार पोसण्याचा प्रमाद करीत असल्याची माहीती लोकमंथनला प्राप्त झाली आहे. विशेष म्हणजे या राज्यस्तरीय प्रकल्पाला राज्यभर नेण्याची जबाबदारी दोन कनिष्ठ अभियंत्यांवर देण्यात आली असून यापैकी नेटवर बसून जगभरातील रस्ते न्याहाळून आभासी प्रस्ताव तयार करीत हुल देण्यात हातखंडा असलेला शाखा अभियंता साबांतील वरिष्ठांना आदेश देण्याचे धाडस दाखवू लागला आहे. तर मराठवाड्यात एका प्रकरणात जामीन मिळत नाही म्हणून कित्येक दिवस लपून बसलेला धोंडगे याच्यावर महत्वाची जबाबदारी सोपविण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.
अरविंद सुर्यवंशी 
निलंबीत होणार?
वरळी उपविभागातील भ्रष्टाचाराला जबाबदार असलेल्या कार्यकारी अभियंता आणि सह अभियंत्यांवर फौजदारी दाखल करावी असा आदेश शासनाने दिला आहे. तथापी मुंबई साबां मंडळाचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी आर्थिक हितसंबधांमुळे फौजदारी गुन्हे दाखल करण्यास टाळाटाळ करून शासकीय आदेश पायदळी तुडविला, असा आरोप आ. चरणभाऊ वाघमारे यांनी केला आहे. आरोप करून आ. वाघमारे थांबले नाहीत तर शासकीय आदेशाची पायमल्ली करून आर्थिक हितसंबध जपणार्‍या अधिक्षक अभियंत्यांना निलंबीत करण्याची मागणी साबांचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह यांना केली आहे, या मागणीची दखल घेऊन साबां प्रधान सचिवांनी मुख्य अभियंता केडगे यांना निलंबनासंदर्भात सुचना वजा आदेश दिल्याचे वृत्त आहे.  या पार्श्‍वभुमीवर अधिक्षक अभियंता निलंबीत होणार का? हा प्रश्‍न मुंबई साबांत अस्वस्थता निर्माण करण्यास कारणीभूत ठरला असून साठ लाखाचे गौडबंगालही चर्चेत आहेत.
हायब्रीड अ‍ॅन्यूटीच्या बारशाला 23 हजार कोटीची बिदागी
भ्रष्टाचाराच्या दक्षिणेवर उपजिविका करणारे बांधकाम सचिव सी. पी. जोशी, लवासातून हाकललेला आचार्य, मराठवाड्यातील भ्रष्टाचार अपचन झाल्यानंतर तोंड लपवत फिरणारे धोंडगे आणि चंद्रकांत दादांसोबत सावलीसारखे वावरूनही प्रतिष्ठेला दंश करणारे खासगी सचिव श्रीनिवास जाधव या चौकडीच्या अभद्र युतीचा कारनामा... 23 हजार कोटीचा रस्ते घोटाळा...
असंगाशी संग झाला तर उत्पत्ती सदोषच निपजणार हा निसर्ग नियम आहे. शुध्द बीजापोटी फळे रसाळ गोमटी हे संत वचन म्हणूनच अनन्य ठरले आहे. बुध्दी भ्रष्ट झाली की वर्तनही भ्रष्ट होते. संपत्तीचा सोस बुध्दी भ्रष्टतेचे प्रमुख कारण आहे, हाच हव्यास सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक अभियंत्याच्या बुध्दी भ्रष्टतेला कारणीभूत ठरला असून बुध्दीभ्रष्ट अभियंत्यांचे वर्तनही भ्रष्ट बनले आहे. याच भ्रष्ट बीजाला पोसले गेल्याने सार्वजनिक विभागात भ्रष्टाचाराला मांडीवर खेळवणारे नवे बाळ जन्माला घातले गेले आहे.
हायब्रीड अ‍ॅन्यूटी... या बाळाच्या बारशालाच तब्बल 23 हजार कोटीच्या गैरव्यवहाराची अंगाई गायीली गेली आहे. या बारसे सोहळ्याचे मानकरी आहेत, अर्थातच बांधकाम सचिव सी. पी. जोशी, कधीकाळी जामीनासाठी पार्श्‍वभागाला पाय लावून पळणारे धोंडगे आणि झाल पळवणारा, लवासातून हुसकावून लावलेला नेटकरी शाखा अभियंता आचार्य. विशेष म्हणजे बांधकाम मंत्र्यांची सावली म्हणून स्वतःला प्रमोट करणारे खासगी सचिव श्रीनिवास जाधव हे देखील या बारशाच्या समारंभाचे प्रमुख निमंत्रक आहेत. या निमंत्रकांची सातारा एसटी आगार प्रमुख म्हणून कार्यरत असतांना झालेला भरती घोटाळा ते निवृत्तीपर्यंत आणि निवृत्तीनंतर दादांचे खासगी सचिव म्हणून काम करण्यास सुरूवात केल्यापासून आज पर्यंतची साबांतीला कर्मकुंडली दररोज तपशीलात...
सीपी टोळीच्या गिधाड धमक्या अन् जाधवांची पोलखोल
साबांच्या भ्रष्टाचाराविरूध्द आवाज उठविणार्‍या लोकमंथनला थांबवायचे कसे? हा सीपी जोशी, अरविंद सुर्यवंशी, किशोर पाटील आणि रणजीत हांडे यांच्यासमोर चिंतेचा मुद्दा आहे. वेगवेगळ्या माध्यमातून साम दाम दंड भेद ही आयुधेही वापरून झाली.पदरी अपयश आल्याने सीपी जोशींच्या आदेशाने उर्वरीत तिघांनी हॉटेलमध्ये गुप्तगूही केले. एखाद्या जाळ्यात अडकावयाचे किंवा नाहीच जमले तर कमावलेल्या हरामाच्या कमाईतून सुपारीचा मार्ग खुला ठेवण्यापर्यंत चर्चाही केली.
या मंडळींची प्रवृत्ती एवढी हीन आहे की यापैकी कुणाचाच कुणावर विश्‍वास नाही. त्यांची गुप्त चर्चाही त्यामुळे गुप्त राहत नाही. यापुर्वीही यापैकीच एकाने श्रीनिवास जाधव यांच्यासंदर्भात काही गोपनीय माहीती नाशिकच्या तिर्थस्थळी फोडली आणि उरलेल्या दोघा उच्चपदस्थांमार्फत लोकमंथनपर्यंत पोहचविण्याची व्यवस्था केली होती. या मंडळीच्या या जुन्या सवयी लोकमंथनला चांगल्या अवगत असल्याने सम्राटच्या बैठकीतुन निपजलेल्या गिधाड धमक्यांना लोकमंथन भिक न घालता साबांच्या भ्रष्टाचाराविरूध्द भुमिका कायम ठेवणार आहे.
नऊशे कोटी गेले पाण्यात
राज्यातील 60 हजार किमी रस्त्यांचे दहा मीटर रूंदीकरण करण्यासाठी आजवर केलेल्या सर्वेक्षणासाठी नऊशे कोटी उधळण्यात आले आहेत. तज्ञ सल्लागारावर केलेला हा खर्च, या शिवाय चारपट किमतीच्या निविदा यावर अधिक प्रकाशझोत उद्यापासून...
चौकट
उद्याच्या अंकात
 काय आहे हायब्रीड अ‍ॅन्यूटी प्रकरण?
 कोण आहे हा नेटवर रस्ते न्याहाळणारा आचार्य?
 आचार्यला साबां मंत्र्याच्या दालनात वरिष्ठ अभियंत्यांची बैठक
   बोलविण्याचा अधिकार कुणी दिला?
 श्रीनिवास जाधव आणि सी. पी. जोशी यांची संशयास्पद
   भुमिका आणि 23 हजार कोटीचा रस्ते घोटाळा
 श्रीनिवास जाधव आणि सी. पी. जोशींची नार्को टेस्ट का ठरली
   आवश्यक.