Breaking News

केडगाव दुहेरी हत्याकांड : आ. संग्राम जगताप यांना 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी


अहमदनगर : नगर महापालिकेच्या पोट निवडणुकीच्या निकालानंतर शनिवारी सायंकाळी केडगावमध्ये शिवसेनेच्या दोन पदाधिकार्‍यांची गोळ्या घालून व कोयत्याचे वार करून निर्घृणपणे हत्या करण्याच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीसांनी राष्ट्रवादीचे आ.अरूण जगताप, आ. संग्राम जगताप व भाजपा आ.शिवाजी कर्डिलेंसहीत एकूण 30 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. तसेच शनिवारी रात्री तीनच्या सुमारास पोलीसांनी आ. संग्राम जगताप यांना या प्रकरणी अटक केली. पोलिसांनी रविवारी आ. संग्राम जगताप यांना न्यायालयात नेले असता, न्यायालयाने त्यांना 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
शिवसेनेने या घटनेच्या निषेधार्थ तसेच आरोपींना तातडीने अटक करावी या मागणीसाठी रविवारी नगर जिल्हा बंद ची हाक दिली होती. या बंदला जिल्ह्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, अनेक ठिकाणी तुफानी दगडफेकीच्या घटना देखील घडल्या आहेत. दरम्यान नगर जिल्ह्यात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिर्डी येथील रविवारचा दौरा देखील रद्द करण्यात आला आहे.शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर(वय 52) व वसंत ठुबे(वय 36,दोघे राहणार केडगाव, नगर)अशी खून झालेल्या दोन्ही शिवसैनिकांची नावे आहेत. माजी महापौर संदिप कोतकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाल्याने महापालिकेच्या रिक्त झालेल्या एका जागेसाठी शनिवारी मतदान झाले होते. रविवारी मतमोजणी हेऊन काँग्रेसचे विशाल कोतकर हे शिवसेना व भाजपा उमेदवारांचा पराभव करून विजयी झाले. या निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान शिवसेना व राष्ट्रवादी यांच्यात जोरदार आरोप प्रत्यारोप झाले होते.
दरम्यान शनिवारी सायंकाळी सव्वा सहा च्या सुमारास शिवसेनेचे उप शहर प्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे हे केडगाव मधील सुवर्णनगर परिसरात दुचाकीवरून एकत्र जात असतांना पाठीमागून आलेल्या 5-6 जणांनी दोघांवर गोळीबार केला. कोतकरांवर गोळीबारानंतर दोघांनीही पळण्याचा प्रयत्न केला. मात्र हल्लेखोरांनी कोयत्याने वार करून त्यांचा अतिशय निर्घृण पणे खून केला. दुहेरी खुनाच्या या घटनेनंतर सर्व हल्लेखोर पसार झाले. मात्र शनिवारी रात्री साडेनऊ च्या सुमारास संदीप गुंजाळ नावाचा तरूण पारनेर पोलीस ठाण्यात स्वत: हून हजर झाला. पोलीसांनी त्याच्याकडून गावठी कट्टा व कोयता अशी हत्यारे जप्त केली आहेत. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयात तोडफोड प्रकरणी पोलीसांनी जवळपास 300 जणांविरूध्द गुनाहा दाखल करून 22 जणांना अटक केली आहे.
शनिवारी रात्री उशीरा या घटनेच्या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या उपस्थितीत मृत संजय कोतकर यांचा मुलगा संग्राम कोतकर यांची फिर्याद दाखल करण्यात आली.दुहेरी खुनाच्या संदर्भात पोलीसांनी राष्ट्रवादीचे आ.संग्राम जगताप यांना जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलावले. ही गोष्ट समजताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठी तोडफोड केली. कार्यालयात धुडगुस घालून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी पोलिसांनी भाजपा आ. शिवाजी कर्डिले, माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी आ. दादा कळमकर, सचिन जगताप, नगरसेवक कैलास गिरवले, निखील वारे, कुमार वाकळे, निखील वारेंसहीत सुमारे 300 जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी कैलास गिरवले, अ‍ॅड.प्रसन्न जोशी यांच्यासहीत 22 जणांना पोलीसांनी अटक केली आहे.
दरम्यान दाखल झालेल्या फिर्यादीच्या आधारे पोलीसांनी राष्ट्रवादीचे नेते आ. अरूण जगताप, आ. संग्राम जगताप, भाजपाचे आ. शिवाजी कर्डिले, माजी महापौर संदीप कोतकर, भानुदास कोतकर, नवनिर्वाचित नगरसेवक विशाल कोतकर यांच्यासहीत अन्य आरोपींनी कट कारस्थान करून संजय कोतकर व वसंत ठुबे यांना गोळ्या घालून व कोयता आणि तलवारीने मारल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्या नुसार पोलीसांनी 30 जणांहून अधिक लोकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. शनिवारी रात्री संदीप गुंजाळ हा आरोपी पारनेर पोलीस ठाण्यात हजर झाला.तसेच पोलीसांनी रविवारी पहाटे 3 वाजता आ.संग्राम जगताप,बाळासाहेब कोतकर व अन्य एक अशा तीन जणांना अटक केली आहे. केडगाव दुहेरी हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत 4 जणांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान सर्व आरोपींना तातडीने अटक करावी, या मागणीसाठी शिवसेनेने रविवारी जिल्हा बंद पुकारला असून जिल्ह्यात या बंदला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद असून काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत.वाहतुकीवर देखील बंदचा परिणाम जाणवत होता.शहरातील प्रमुख चौकांमध्ये केडगाव गुहेरी हत्याकांडाच्या घटनेचा निषेध करणारे फलक देखील लावण्यात आले होते.बंद च्या पाश्वभूमीवर नगर शहरा सहीत संपूर्ण जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे.जिल्ह्यात तणावपूर्ण शांतता असून शिर्डी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तणावाच्या व जिल्हा बंदच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा दौरा देखील रद्द झाला आहे.