Breaking News

तहसीलदारांच्या कार्यालयातच वचक नाही दुपारीच कार्यालय होते मोकळे

श्रीगोंदा / प्रतिनिधी । 11 ः तालुक्याचे प्रमुख कार्यालय म्हणून तहसील कार्यालयाकडे पहिले जाते. इतर शासकीय कार्यालयावर तहसील कार्यालयाचा वचक असतो, परंतू तहसील कार्यालयातच तहसीलदारांच्या वचक राहिला नसल्याचे दिसून येते. 
मंगळवार आठवड्याचा दुसरा दिवस असल्यामुळे ग्रामीण भागातून अनेक नागरिक कामानिमित्त तालुक्याला येत असतात. त्यात तहसील कार्यालयात येणार्‍या नागरिकांची संख्या अधिक असते. याठिकाणी येणार्‍या नागरिकांना रेशनकार्ड, विविध दाखले अथवा जमिनीच्या कामासाठी अनेक नागरिक येत असतात. परंतू आज मंगळवार असून सुद्धा या कार्यालयात शिपाई वगळता एकही जबाबदार अधिकारी हजर नसल्याचे दिसून आले. दोन्ही नायब तहसीलदार गायब होते, तर पुरवठा शाखेला तर कुलूपच लागलेले दिसून आले. तर संजय गांधी योजनेच्या शाखेत विभागाचे ढवळे नावाचे एकमेव अधिकारी प्रकरणाची जुळवाजुळव करत असल्याचे दिसून आले. इतर कार्यालये मात्र बंद होते. स्वतः तहसिलदार यांच्या कार्यालयाला कुलूप लावले असल्यामुळे इतर अधिकार्‍यांनीही दांडी मारली असल्याची चर्चा होती. तहसील कार्यालयात अशी परिस्थिती बर्‍याच वेळा दिसून येते. त्यामुळे जर स्वतः तहसीलदार हजर असतील तरच इतर अधिकारी कर्मचारी हजर असतात असा अलिखित नियमच या कार्यालयाने पाडला असल्याचे दिसून येते. त्यामुळे स्वतः तहसीलदार यांनी या प्रकारात लक्ष घालणे गरजेचे आहे.