Breaking News

निवारा बालगृहाच्या बांधकामास मा. दत्तात्रय भोसले यांचेकडून 5000 वीटांची मदत

जामखेड / ता. प्रतिनिधी । 11 ः जामखेड तालुक्यातील ग्रामीण विकास केंद्र संस्थेच्या वतीने अनाथ, निराधार, लोक कलावंत, ऊस तोड मजूर, वीट भट्टी कामगार, दलित, आदिवासी, वंचित दुर्लक्षित घटकातील गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुरू असलेल्या निवारा बालगृहाच्या बांधकामास जामखेड तालुक्यातील खर्डा येथील दत्तात्रय भोसले यांनी काही दिवसांपूर्वी दै. लोकमंथन मधील वृत्त पत्रात, बालगृहाचे बांधकाम मदतीअभावी बंद असल्याची बातमी वाचून लोक सहभागातून सुरू असलेल्या उपक्रमास निश्‍चित हातभार लावत उपक्रम उभा करण्यासाठी आपल्या वतीने 5000 वीटांची मदत जाहीर करून सदर उपक्रम गोर गरीबांचे विद्यार्थी घडवण्याचे कार्य करीत असून या उपक्रमात सर्वांनी मिळून मिसळून काम पुढे घेऊन जाण्याचे व आपण समाजाचे काहीतरी देणे आहोत या मताने दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन मदत करण्याचे आवाहन केले. संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामास प्रत्यक्ष भेट देऊन कामाची पाहणी करून शुभेच्छा दिल्या. बालगृहातील विद्यार्थ्यांना द्राक्षे, कलिंगड व चिकू आदी फळांची वाटप करून मुलांसोबत गप्पा गोष्टी करुन त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद पाहून समाधान व्यक्त केले.
संस्थेचे संस्थापक अ‍ॅड. डॉ. अरूण जाधव यांनी दत्तात्रय भोसले यांनी केलेल्या मदतीबद्दल आभार व्यक्त करून त्यांना फेटा बांधून व पुस्तक भेट देऊन सत्कार केला. त्याचबरोबर राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणार्‍या व्यक्तींनी आदर्श घेऊन मदतीचे आवाहन केले. यावेळी दत्तराज पवार, रोहित भंडारी, कांतीलाल जाधव, निवारा बालगृहाचे अधिक्षक संतोष गर्जे, शिवराणा ग्रुपचे अध्यक्ष धनराज पवार, सर्जेराव सावंत, दत्तात्रय आहेर आदी उपस्थित होते.