Breaking News

सिन्नर तालुक्यातील जवान निलेश वामने यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नाशिक, दि. 11, एप्रिल - चेन्नई येथे मोटारसायकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचा जवान निलेश चंद्रभान वामने यांच्यावर आज  सिन्नर तालुक्यातील डूबेर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
चेन्नईत सीआयएसएफ दलात प्रशिक्षक म्हणून निलेश काम करत होते. सोमवारी (दि.9) मोटारसायकल अपघातात अन्य साथीदारासह निलेशचा मृत्यु झाला होता. आज  सकाळी सीआयएसएफचे जवान व नाशिक ग्रामीण पोलीस निलेशचे पार्थिव घेऊन गावात दाखल झाले. तेव्हा नातेवाईकांचा एकच आक्रोश झाला.
सजवलेल्या वैकुंठ रथातून पार्थिव गावातून मिरवित निलेश ‘अमर रहे’ च्या घोषणा देण्यात आल्या. यावेळी रस्त्यांवर ठिकठिकाणी रांगोळीतून निलेश ‘अमर रहे’ अशी घोष  वाक्य रेखाटण्यात आली होती. जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी निलेशच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करून श्रध्दांजली वाहिली. पार्थिव अमरधाम मध्ये पोहचल्यावर निलेशवर  शासकीय इतमामात अंतिमसंस्कार करण्यात आले. यावेळी सीआयएसएफ च्या जवानांनी निलेशला सलामी दिली.
नाशिक ग्रामिण पोलिसांनी हवेत तीन राउंड फायर करून मानवंदना दिली. आमदार राजाभाऊ वाजे, पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे, नायब तहसीलदार  प्रशांत पाटील, उपसरपंच अनिल वारुंगसे, नारायण वाजे, टी. आर. वाजे, अंबादास वाजे, शरद माळी यांनी श्रद्धांजली वाहिली.