Breaking News

कष्ट करुन पिकवलेल्या मालाला सरकार भाव देत नाहीय- अजित पवार

सातारा, दि. 10 एप्रिल -  आमच्या काळातही शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या परंतु शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी म्हणून आम्ही धोरणं ठरवत होतो. माझ्या शेतकर्‍याला सावकाराच्या दारात जावे लागता कामा नये म्हणून प्रयत्न केले जात होते. परंतु आज काय अवस्था आहे कष्ट करुनही पिकवलेल्या मालाला सरकार भाव देत नाहीय अशी खंत आणि सरकारविषयी संताप अजित पवार यांनी वाईच्या जाहीर सभेत व्यक्त केला. भाजप-सेनेचे सरकार आल्यावर महाराष्ट्रावर अन्याय झालाच परंतु सर्वाधिक अन्याय पश्‍चिम महाराष्ट्रावर झाला आहे. आमच्यावेळी पाऊणे तीन लाख कोटीचे कर्ज होते. परंतु आज पावणेचार लाख कोटीचे कर्ज राज्यावर करुन ठेवले आहे आणि निवडणूक जाहीर होण्याअगोदरपर्यंत 5 लाख कोटीचे कर्ज होणार आहे. तुम्हाला महाराष्ट्राला कर्जबाजारी करण्यासाठी जनतेने निवडून दिले का असा सवाल दादांनी केला.
वांग्याला,टोमॅटोला,कांद्दयाला दर नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.कसं जगायचं शेतकर्‍यांनी. हे सरकार शेतकर्‍यांच्या मुळावर उठले आहे.शेतकरी आत्महत्या करत आहे.या सरकारला लाज नाही शरम वाटली पाहिजे अशा शब्दात सरकारचा समाचार घेतला. आत्महत्या रोखण्यासाठी कोणतंही धोरण सरकार ठरवत नाहीय.शेतकरी आत्महत्या करताना सरकारच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवत माझ्या मृत्यूनंतर तरी कर्जमाफी मिळावी अशी मागणी करत आहेत. भाजपच्या महामेळाव्यात भाषणाच्यावेळी मुख्यमंत्री टाळी वाजवत होते. आता ती टाळी कशी वाजवत होते ते तुम्ही पाहिलं असाल किंवा ते नक्की बघा. तशी टाळी कोण वाजवत हे माहित आहे तुम्हाला. अहो मर्दासारखं बोला ना, मर्दासारखा आसूढ ओढा ना, अहो मुलांच्या भवितव्याबाबत बोला ना, शेतकर्‍यांना कर्जमाफी द्दया ना, नोकरभरती सुरु करा, सर्वसामान्यांना दिलेल्या आश्‍वासनाबाबत बोला ना ? असे अनेक सवाल दादांनी सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना केले.