Breaking News

समर्पित भावनेतून काम केल्यास शासकीय रुग्णालयांचा कायाकल्प ः जिल्हाधिकारी


नगर । प्रतिनिधी - प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील नागरिक हा सेवेचा मुख्य केंद्रबिंदू आहे. जिल्ह्यात चांगले काम करणारे अधिकारी, कर्मचारी आहेत. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांचा उचित गौरव होत आहे. समन्वय व सुसंवाद ठेवून आरोग्यसेवकांनी समर्पित भावनेतून काम केल्यास शासकीय रुग्णालयांचा कायाकल्प होऊन लौकिक निश्चित वाढेल, असा विश्वास व्यक्त करतांनाच घटलेल्या कन्या जन्मदराच्या बाबतीत समुपदेशनाच्या माध्यमातून आरोग्य सेवक महत्वाची भूमिका बजावू शकतात असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यायातील नियोजन भवन सभागृहात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कायाकल्प पुरस्काराचे वितरण जिल्हाधिकारी महाजन यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजित माने, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बापूसाहेब गाडे, महानगरपालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल बोरगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडितराव लोणारे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. शिंदे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. लाळगे आदींसह जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी, परिचारिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.