बाह्यवळण रस्त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा
नगर । प्रतिनिधी - शहराबाहेरुन जाणार्या बाह्यवळण (राज्य महामार्ग रस्ता क्र.222) रस्ता दुरुस्तीच्या कामाचे उद्घाटन होवून काम अर्धवट स्थितीत थांबल्याने पावसाळ्यापूर्वी तातडीने सदरील काम पूर्ण करण्याची मागणी निंबळक व अरणगाव गटातील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. या रस्त्याचे काम दि.20 एप्रिलपूर्वी सुरु न केल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देत उपकार्यकारी अभियंता एस.एस. घोडके यांना निवेदन देण्यात आले. दोन ते तीन महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा करत मंत्र्यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले. या रस्त्यासाठी 18 कोटी रुपये मंजूर आहेत. या रस्त्यावर ठेकेदाराने खडी व मुरुम टाकले असून, त्याला कामापोटी पन्नास लाख रुपये अदा करण्यात आले. मात्र हे काम अनेक दिवसापासून अर्धवट स्थितीत रखडल्याने संपूर्ण परिसर धुळीने माखला आहे. ठेकेदारावर वचक नसल्याने काम रेंगाळले जात असल्याने याचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे. रस्ता खराब असल्याने अवजड वाहतूक शहरातून वळाल्यास अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रस्त्यावरील धुळीमुळे या परिसरातील शेतीच्या पिकांचे नुकसान होत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम न झाल्यास केलेल्या कामावर पुन्हा पाणी फेरले जाणार असून, याचा त्रास ग्रामस्थांना सहन करावा लागणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे.