Breaking News

आ.विनायक मेटेंची जिल्हा परिषदेत एन्ट्री!

बीड, (प्रतिनिधी):- शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी प्रथमच आज सकाळी जिल्हा परिषदेत एंन्ट्री केली. आ.मेटे यांच्या सरप्राईज भेटीने पदाधिकार्यांसह अधिकार्यांनाही आश्‍चर्याचा धक्का बसला. यावेळी आ.मेटे यांनी पंचायत समितीसह अन्य मुद्यांवर मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर उपाध्यक्षांच्या कॅबीनमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला. आ.मेटे जिल्हा परिषदेत आल्याचे कळताच जि.प.अध्यक्षांनीही त्यांना निमंत्रण देत त्यांचा पाहुणचार केला. दरम्यान आठवडाभरापुर्वीच जिल्हा प रिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये समान निधी वाटपावरुन शिवसंग्रामच्या सदस्यांनी भाजपच्या विरोधात मतदान केले होते. त्या पार्श्‍वभुमीवर शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांचा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कॅबिनमधील पाहुणचार चर्चेचा विषय ठरला आहे.

शिवसंग्रामचे अध्यक्ष आ.विनायक मेटे यांनी आज सकाळी प्रथमच जिल्हा परिषदेला भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांच्या दालनात आ.मेटे यांनीे त्यांच्याशी चर्चा केली. बीड पंचायत समितीत कंत्राटीसह अनेक कर्मचारी अनेक वर्षांपासुन एकाच जागेवर ठाण मांडून असल्याने त्यांची बदली करावी, रमाई आवास, पंतप्रधान घरकुल योजनेतर्ंगत लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्यात यावा अशा सूचनाही आ.मेटे यांनी केल्या. ऊसतोड मजुर पाल्यांच्या हंगामी वस्तीगृहातील भ्रष्टाचार प्रकरणात बायोमॅट्रीक उपस्थिती पाहूनच संबंधिताना अनुदान देण्यात यावे असा मुद्दाही आ.मेटे यांनी मांडला. सीईओंशी झालेल्या चर्चेनंतर आ.मेटे यांनी उपाध्यक्षांच्या कॅबिनला भेट दिली. त्याठिकाणी त्यांचा सत्कार करण्यात आला. आ.मेटे जिल्हा परिषदेत आल्याची माहिती कळताच जिल्हा परिषद अध्यक्षांनी त्यांना निमंत्रण दिले. त्यानंतर आ.मेटे यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कॅबिनलाही भेट दिली. याठिकाणी अध्यक्षा सविता गोल्हार यांचे पती विजय गोल्हार यांनी आ.मेटे यांचा सत्कार केला. दरम्यान जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजप आणि शिवसंग्राममध्ये गेल्या काही दिवसांपासुन अंतर्गत कलह सुरु आहे. आठवडाभरापुर्वी जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात झालेल्या सर्वसाधारण सभेत समाज कल्याण विभागाच्या समान निधी वाटपावरुन आक्रमक झालेल्या शिवसंग्रामने मतदान घेण्याची मागणी करत भाजपच्या विरोधात मतदान केले होते. त्या पार्श्‍वभुमीवर आ.विनायक मेटे यांचा जिल्हा परिषद अध्यक्षांनी केलेला पाहुणचार चर्चेचा विषय ठरला आहे. सत्ताकारणातील बदलते राजरंग आगामी काही दिवसांमध्ये आणखी काही वेगळे संकेत देणार की काय? अशी चर्चाही होवू लागली आहे.