Breaking News

रेपो दर जैसे थे ; कर्जदारांना दिलासा नाही रेपो 6 टक्के, तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्क्यांवर कायम

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी गुरूवारी चालु आर्थिक वर्षातील पतधोरण जाहीर केले. रेपो रेट सहा टक्क्यांवर तर रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के असा क ायम ठेवण्यात आला आहे. व्याजाचे दर कमी होतील, अशी कर्जदारांची अपेक्षा होती, मात्र रेपो रेट कायम ठेवल्यामुळे कर्जदारांची अपेक्षा पुन्हा एकदा मावळली.अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात करण्याची मागणी केली जात होती. मात्र, रेपो दर कायम ठेवण्यात आल्याने सर्वसामान्यांचा हिरमोड झाला आहे. रेपो रेट कायम ठेवण्यात आल्याने व्याजदरात दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे.


चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) महागाईत वाढ शक्य असल्याचे रिझर्व्ह बँकने म्हटलं आहे. या तिमाहीत हा महागाई दर 5.1 टक्के कायम राहण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्ये महागाई दर घटून 4.4 टक्क्यांवर आला होता. चालू आर्थिक वर्षातील दुसरी तिमाही (जुलै-सप्टेंबर) या काळात महागाई दर 4.7 टक्के, तर तिसरी तिमाही (ऑक्टोबर ते डिसेंबर) आणि चौथी तिमाही (जानेवारी ते मार्च) या काळात महागाई दर 4.4 टक्के राहण्याचा अंदाज आहे.
2019-20 या काळात महागाई दर 4.5 ते 4.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे. यामध्ये जीएसटीतील अडचणी दूर करणे, कर्जाचा वाढता वेग, आयपीओ बाजारातील वाढ, बँकांना अतिरिक्त निधी, जागतिक व्यापारातील वेगाने होणारी वाढ आणि अर्थसंकल्पात मूलभूत सुविधा आणि ग्रामीण भागांच्या विकासावर भर यांचा समावेश आहे. 2018 -19 मध्ये विकास दर 7.3 टक्के राहण्याचा अंदाज, 2017-18 मध्ये विकास दर 6.6 टक्के राहण्याची शक्यता. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) विकास दर 7.3 टक्के कायम राहण्याची शक्यता आहे. दुसरी तिमाही (जुलै-सप्टेंबर) या काळात विकास दर 7.4 टक्के, तर तिसरी तिमाही (ऑक्टोबर ते डिसेंबर) 7.3 टक्के आणि चौथी तिमाही (जानेवारी ते मार्च) या काळात विकास दर 7.6 टक्के राहण्याचा अंदाज आहे.