Breaking News

सीआरपीएफच्या गाडीवर दगडफेक ; दोन जवान शहीद

अनंतनाग - केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या वाहनावर दगडफेक करण्यात आली. त्यावेळी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जवान शहीद झाले. अनंतनाग जिल्ह्यातील कोकेरनाग परिसरात ही घटना घडली. रियाझ अहमद वाणी आणि निशार अहमद वाणी अशी शहीद जवानांची नावे आहेत. दोघेही 164 बटालियनचे जवान होते. कोकेरनाग परिसरातून जात असताना स्थानिकांकडून जवानांच्या वाहनाला लक्ष्य करण्यात आले. त्यामुळे वाहनचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रकला जोराची धडक बसली. त्यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत तीन जवान जखमी झाले असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी तक्रार दाखल केली असून तपास सुरू असल्याचे वृत आहे.