Breaking News

भारतातील 5.6 लाख फेसबुक वापरकर्त्यांची माहिती चोरी जगभरातील 8.7 कोटी वापरकर्त्यांचा समावेश

नवी दिल्ली - फेसबुकवरील जवळपास 5.6 लाख भारतीय वापरकर्त्यांची माहिती चोरीला गेल्याची माहिती फेसबुकने दिली आहे. एका खासगी मार्केटिंग कंपनीने एका प्रश्‍नावलीच्या आधारे ही माहिती चोरत केंब्रिज अ‍ॅनालिटिकाला विकली होती. या चोरीत जगभरातील 8.7 कोटी वापरकर्त्यांच्या माहितीचाही समावेश आहे.
भारत सरकारने दिलेल्या एका नोटिशीला प्रतिसाद देत फेसबुकने ही माहिती दिली आहे. भारत सरकारने फेसबुकला माहिती चोरीच्या प्रकरणात भारतातील किती वापरक र्त्यांची माहिती चोरीला गेली, याची सविस्तर माहिती मागितली होती. तसेच फेसबुक माहिती चोरी रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना करत आहे, याबाबतही विचारणा करण्यात आली होती. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी सांगितले, की भारतातील फेसबुकच्या 335 वापरकर्त्यांनी नोव्हेंबर 2013 ते डिसेंबर 2015 दरम्यान ’दिस इज युवर डिजीटल लाईफ’ नावाचे प्रश्‍नावली अ‍ॅप वापरले. यात जवळजवळ 5 लाख 62 हजार 455 वापरकर्त्यांच्या माहितीची चोरी झाली. फेसबुकचे तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख माईक श्रोफर यांनी आपल्या ब्लॉगमध्ये देशनिहाय माहितीचोरीचा तपशील दिला होता. यातील सर्वाधिक वापरकर्ते अमेरिकेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले होते.

संबंधित अ‍ॅप केंब्रिज विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागाचे संशोधक अ‍ॅलेक्झांडर कोगन आणि त्यांची कंपनी ग्लोबल सायन्स रिसर्च यांनी विकसित केले होते. या अ‍ॅपने 335 वापरकर्त्यांच्या माहितीसह त्यांच्या मित्रांच्याही खासगी माहितीची चोरी केली. वापरकर्त्यांची ही आकडेवारी संबंधित अ‍ॅप वापरणार्‍या एकूण वापरकर्त्याच्या फक्त 0.1 टक्के असली तरी त्याचा परिणाम 5 लाख 62 हजार 120 वापरकर्त्यांवर झाल्याचेही नंतर स्पष्ट झाले. एखाद्या वापरकर्त्यांना हे अ‍ॅप वापरले तर त्याचा परिणाम त्या वापरकर्त्याच्या मित्र यादीतील वापरकर्त्यांवरदेखील झाला. हे अ‍ॅप फेसबुकवर 2013 ते डिसेंबर 2015 दरम्यान अस्तित्वात होते, त्यानंतर फेसबुकने हे अ‍ॅप हटवले.

मला पुन्हा एकदा संधी द्या : झुकेबर्गचे आवाहन
‘मला पुन्हा एकदा संधी द्या, फेसबुक चालवण्यासाठी मी अजूनही समर्थ आहे, अशा शब्दांमध्ये फेसबुकचा सीईओ मार्क झुकेरबर्गने त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. केंब्रिज ऍन ॅलिटिका डेटा लिक प्रकरणामुळे जगभरातून फेसबुकवर मोठी टीका होत आहे. ‘फेसबुककडून झालेल्या डेटा लिकची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. ही जबाबदारी मी स्वीकारतो’,असे झुकेरबर्गने पत्रकार परिषदेत म्हटले आहे. वापरकर्त्यांची माहिती इतक्या मोठया प्रमाणात लिक झाल्यानंतरही फेसबुकचे नेतृत्त्व करण्यासाठी तुम्ही स्वतःला सक्षम समजता का असा प्रश्‍न यावेळी पत्रकारांनी त्याला विचारला. या प्रश्‍नला त्याने होकारार्थी उत्तर दिले. फेसबुकवरील 8 कोटी 70 लाख लोकांची माहिती लिक झाल्याने जगभरात खळबळ उडाली आहे. यातील बहुतांश वापरकर्ते हे अमेरिकेतील आहेत.