Breaking News

महागाईच्या काळात सर्वसामान्य रुग्णांना मोफत शिबीराचा मोठा आधार -प्रा.निवृत्ती आरु


धावपळीचे जीवन, बदलती जीवनशैली व व्यायामाच्या अभावामुळे आजारांचे प्रमाण वाढत आहे. पैसा कमविण्यासाठी नागरिक आरोग्याची हेळसांड करतात. तर मिळालेल्या पैश्यातून पुन्हा आरोग्यासाठी खर्च करतात. महागाई वाढत चाललेली असताना आरोग्यसेवा सर्वसामान्यांना परवडत नाही. अशा परिस्थितीत सर्वसामान्य रुग्णांना मोफत शिबीराचा मोठा आधार मिळत असल्याची भावना प्रा.निवृत्ती आरु यांनी व्यक्त केली.
महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त समाज परिवर्तन संस्था व जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या सहयोगाने महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ समिती, समाज परिवर्तन संस्था, आनंद हॉस्पिटल, जिल्हा रुग्णालय, महापालिका आरोग्य, आय.एम.पी.ए. (एम्पा) व ग्लोबस डायग्नोस्टीक्सच्या संयुक्त विद्यमाने पाईपलाइन रोड येथील आनंद हॉस्पिटल मध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रा.आरु बोलत होते. महापुरुषांच्या प्रतिमेस नगरसेविका रुपालीताई बारस्कर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नारायण इंगोले, अ‍ॅड.भानुदास होले, एन.एम. पवळे, रावसाहेब काळे, अ‍ॅड.महेश शिंदे, पी.पी. खंडागळे, सुधाकर जाधव, डॉ.भगवान चौरे, मायाताई जाधव, सुनिल गायकवाड, रजनी ताठे आदि उपस्थित होते.प्रास्ताविकात डॉ.भास्कर रणनवरे म्हणाले की, दरवषी महात्मा फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून उपनगरातील गरजू रुग्णांना खर्चिक आरोग्य सुविधा मोफत उपलब्ध करुन दिली जाते. समाजातील गरजू घटकातील रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला. रुपाली बारस्कर यांनी महिलांवर कुटुंबाचे आरोग्य टिकलेले असते. महिलांचे आरोग्य धोक्यात आल्यास त्या कुटुंबाला मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागतो. महिलांचे आरोग्य उत्तम राहिल्यास त्या कुटुंबाचे आरोग्य उत्तम राहते. यासाठी महिलांना आरोग्याची काळजी घेण्याचे त्यांनी आवाहन केले.
रुग्णांची तपासणी डॉ.भास्कर रणनवरे, डॉ.अमित पवळे, डॉ.कल्पना रणनवरे, डॉ.आयेशा शेख, डॉ.सुशिल तुरुकमाने, डॉ.प्रमोद हिरभगत, डॉ.श्रीकांत घोडके यांनी केली. या शिबीरात दंत तपासणी, गरोदर माता व महिलांसाठी आरोग्य तपासणी, त्वचारोग तपासणी, रक्त, लघवी तपासणी मोफत करण्यात आली. याचा 232 रुग्णांनी लाभ घेतला. तर यावेळी सोनोग्राफी व मॅमोग्राफी माफक दरात उपलब्ध करुन देण्यात आली होती.