Breaking News

राष्ट्रवादी पदाधिकार्‍यांच्या हाती कुदळ


सोलापूर, दि. 30, एप्रिल - पाणी फाउंडेशनच्या वतीने वॉटर कप स्पर्धेसाठी जिल्ह्यातील 254 गावांमध्ये काम सुरू आहे. पाणी अडवा, पाणी जिरवा याच संकल्पनेतून ही कामे सुरू आहेत. या सामाजिक कामास आता राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी हातभार लावणार आहेत. 1 ते 5 मे या कालावधीत तालुक्यातील गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार, माजी आमदार, तालुक अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष, आजी-माजी पदाधिकारी, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य गावांमध्ये जाऊन नागरिकांसोबत श्रमदान करणार आहेत. ही माहिती जिल्हाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. श्रमदान केलेल्या गावांमध्ये पाणी फाउंडेशनच्या धर्तीवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून जेसीबी उपलब्ध करून देण्यात येतील. यासाठी संबंधित तालुक्याचे तालुकाध्यक्ष यांच्याशी समन्वय साधून कामांची गरज पाहून जेसीबी मशीन व मशीन असेल तर डिझेलसाठी पैसे देण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष साळुंखे-पाटील यांनी सांगितले. 

निसर्गाचा असमतोल वाढत आहे, पाण्याचे दुर्भिक्ष मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी अडविणे गरजेचे आहे. त्यासाठीच श्रमदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकार्‍यांचा सहभाग असणार आहे. सर्व महिला पदाधिकारी निवड केलेल्या गावांमध्ये सहभागी होण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामध्ये महिला जिल्हाध्यक्ष व महिला तालुकाध्यक्ष यांच्यात समन्वय साधून काम करण्यात येणार आहे.