Breaking News

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी ताहीर मर्चंटचा मृत्यू

पुणे - 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी मोहम्मद ताहीर मर्चंट याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान ताहीरचा मृत्यू झाला आहे. येरवडा तुरुंगात शिक्षा भोगणार्‍या आरोपी ताहीरला हृदविकाराचा झटका आल्याने त्याला तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान ताहीरचा मृत्यू झाला आहे. 1993 च्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषी असणार्‍या आरोपी मोहम्मद ताहीर मर्चंट याची येरवडा तुरुंगात रवानगी करण्यात आली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी याकूब मेनन याचा ताहीर जवळचा साथीदार होता.
12 मार्च 1993 ला मुंबईतील सीरियल बॉम्बस्फोट खटल्याप्रकरणी 7 सप्टेंबरला ताहिर मर्चंट आणि फिरोज खान यांना फाशीची शिक्षा सुनावली होती. याचप्रकरणी क रीमुल्लाह खानला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बॉम्बस्फोटातील काही आरोपींना पाकिस्तानला पाठवल्याप्रकरणी ताहिर मर्चंटला टाडा कोर्टानं त्याला दोषी ठरवलं.
12 मार्च 1993 सा मुंबईत तब्बल 12 ठिकाणी बॉम्बस्फोट झाले होते. या बॉम्बस्फोटात 257 जणांचा मृत्यू झाला होता. तर 700 पेक्षा अधिक जण जखमी झाले होते. या स्फोटात मोठ्या प्रमाणात आरडीएक्सचा वापर करण्यात आला होता. या स्फोटात 27 कोटींच्या संपत्तीचे नुकसान झाले होते. याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, टायगर मेमनसह तब्बल 27 आरोपी अद्यापही फरार आहेत.