Breaking News

महापुरुषांच्या पुतळयाभोवतीची अतिक्रमणे हटवा अन्यथा आंदोलन


शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्यांभोवती अतिक्रमणाच्या भयंकर विळख्याविरोधात आज संगमनेर शिवसेनेसह आंबेडकर अनुयायांनी घोषणाबाजी देत नगरपालिका प्रशासनाला निवेदन दिले. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याभोवती अनेकांनी आपली कायमस्वरूपी दुकाने, टपऱ्या थाटल्या आहेत. या दुकानांवरील पाल, छत्र्या यामुळे महापुरुषांची स्मारके दिसेनासी झाली आहेत. ही सर्व अतिक्रमणे हटविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

येत्या १४ एप्रिल रोजी महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होणार आहे. त्यासाठीची तयारी म्हणून अनेक आंबेडकर अनुयायी याठिकाणी येत असतात. तसेच याठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन व विचारांची देवाण घेवाण होत असते. यावेळी अशा अनधिकृत अतिक्रमणधारकांचा, फेरीवाले, टपरीधारकांचा अडथळा निर्माण होत असतो. पालिका प्रशासन आयत्यावेळी अशा सणांच्या आधी येऊन हि अतिक्रमणे हटविण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असते. परंतु काही दिवसांतच ही अनधिकृत फेरीवाले, टपरीधारक पुन्हा नव्याने येऊन आपली बस्तान मांडत असतात. आज याविषयी कायमस्वरूपी कारवाई करण्यासंबंधीचे निवेदन संगमनेर शहर शिवसेना अध्यक्ष अमर कतारी त्याचबरोबर सिद्धार्थ दारोळें, किसनराव वाकचौरे आदींसह कार्यकर्त्यांनी दिले.