Breaking News

अकरावीचे आरक्षणातील प्रवेशही होणार ऑनलाइन


मुंबई, प्रतिनिधी, दि. 8 - अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतील आरक्षणातील प्रवेश आतापर्यंत ऑफलाइन पद्घतीने होत होते, तेही यंदापासून ऑनलाइनच देण्यात येणार आहेत. याबाबतचा सरकारचा आदेश आठवड्याभरात जारी होण्याची शक्यता आहे. 
अकरावीची प्रवेश प्रक्रिया मुंबई, ठाणे, रायगड आणि पुणे जिल्ह्यांत ऑनलाइन केली जाते; मात्र इन हाऊस, व्यवस्थापन आणि अल्पसंख्याक आरक्षणातील प्रवेश कनिष्ठ महाविद्यालयांच्या स्तरावर ऑफलाइन पद्धतीने होतात. अनेक विद्यार्थी दोन्ही प्रकारच्या प्रवेश प्रक्रियांत नोंदणी करतात. या आरक्षणातील प्रवेशांत अनेक महाविद्यालयांचे व्यवस्थापन आर्थिक गैरप्रकार करीत असल्याच्याही तक्रारी काही वर्षांत वाढल्या होत्या. सिस्कॉम या पुण्यातील संस्थेने या सर्व प्रकाराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिकाही दाखल केली होती. न्यायालयाने मार्च 2015 मध्ये निर्णय देताना हे प्रवेश पूर्णपणे ऑनलाइन करण्याचे आदेश दिले होते. परिणामी, या प्रवेशांच्या प्रक्रियेचा अभ्यास करण्यासाठी कोअर कमिटीने बैठका घेऊन चर्चा केली होती. 
2015-16 च्या अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत दोन लाख 89 हजार 732 पैकी 98 हजार 764 जागा ऑफलाइन पद्घतीने भरल्या होत्या. जवळपास इतकेच एक लाख एक हजार 862 प्रवेश ऑनलाइन झाले होते. 50 टक्के प्रवेश ऑफलाइनच होत असतील, तर ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचा उपयोग काय, असा सवाल वारंवार विचारला जात होता.  अकरावी प्रवेश प्रक्रियेतील त्रुटींविषयी आम्ही उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. एकही प्रवेश ऑफलाइन होता कामा नये, असे उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. कारण ऑफलाइन प्रवेश देताना गैरप्रकार होण्याची शक्यता असते. प्रवेश प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी सर्वच प्रवेश ऑनलाइन व्हावेत, अशी आमची मागणी आहे.