Breaking News

विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानात पारंगत व्हावे


संगमनेर प्रतिनिधी - पुस्तकी ज्ञानाबरोबरच नवनवीन तंत्रज्ञान शिकण्यात विद्यार्थ्यांनी रुचि दाखविली पाहिजे. तंत्रज्ञानाचा वापर दैनंदिन जीवनात कसा करता येईल, याचा विचार त्यांनी करायला हवा. हे करत असताना विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञानात पारंगत व्हावे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आय. टी. अभ्यासक्रम मंडळाचे प्रमुख डॉ. परिक्षीत महल्ले यांनी व्यक्त केले.

अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती व तंत्रज्ञान विभाग तसेच इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स (आयईआय) इंडिया स्टुडंट चाप्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज-अ‍ॅप्लिकेशन आणि रिसर्च एरिया’ या विषयावर एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. चर्चासत्रास उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांशी हितगुज सढताना ते बोलत होते.

चर्चासत्राप्रसंगी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, विभागप्रमुख डॉ. बायसा गुंजाळ आदी उपस्थित होते. डॉ. बायसा गुंजाळ यांनी आय.टी. विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. चर्चासत्राची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली तर प्रमुख वक्ते डॉ. परिक्षीत महल्ले यांचा सत्कार अनिल शिंदे यांनी केला. याप्रसंगी द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ वर्षाचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रा. सुदीप हासे यांनी संपादित केलेल्या ‘अन्वेष’ या मासिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. महल्ले यांनी या चर्चासत्राच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांना ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ याची परिभाषा सांगितली. धापवळीच्या जीवनात या तंत्रज्ञानाच्या वापराने दैनंदिन कामे अगदी चुटकीसरशी होतात. अद्ययावत सेंसर्स, उत्कृष्ट तंत्रज्ञान, हार्डवेअर, त्यामधील संपर्क, आर. एफ. आय. डी., वायरलेस पॅन यांच्या वापराने अवघड कामे अतिशय सोपी होतात. डॉ. महल्ले यांनी संशोधित केलेली आठ पेटंट यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडली.

शेतातल्या बुजगावण्यापासून तर घरातील पंखा आणि फ्रीजचा घरबसल्या मोबाईलच्या माध्यमातून वापर, मॉलमध्ये गेल्यानंतर घरातील कोणता किराणा संपला असून तो नेणे आवश्यक आहे, याचा अचूक मेसेज मोबाईलवर पाठविला जातो. यासारख्या अनेक घटना त्यांनी प्रात्यक्षिकाद्वारे सांगितल्या. चर्चासत्रोच समन्वयक म्हणून प्रा. आर. एस. भोसले यांनी काम पाहिले. सूत्रसंचलन प्रा. सुदीप हासे यांनी केले. डॉ. बायसा गुंजाळ यांनी आभार मानले.