Breaking News

खरीप हंगामात बी-बियाणे, खते, कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध

जामखेड -  तालुक्यातील खरीप हंगामाचे नियोजन प्रशासनाने पूर्ण केले असून नागरिकांना बी-बियाणे, खते आणि कीटकनाशकांची कमतरता भासणार नसल्याचे प्रतिपादन राज्याचे जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी केले.

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी जामखेड येथे खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक घेऊन प्रशासनाने केलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीत नूतन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्‍वजीत माने, उप महावनसंरक्षक आदर्श रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) वामन कदम, उपविभागीय अधिकारी अर्चना नष्टे पंचायत समिती सभापती सुभाष आव्हाड, उपसभापती राजश्री मोरे, पं.स. सदस्य मनिषा सुरवसे डॉ. भगवान मुरूमकर, सुर्यकांत मोरे, तालुकाध्यक्ष रवि सुरवसे, जि.प. सदस्या वंदना लोखंडे, सोमनाथ पाचरणे, तालुका कृषी अधिकारी दिपक सुपेकर, कृषी मंडलाधिकारी सुंदरदास बिरंगळसह विविध पदाधिकारी, विविध गावांचे सरपंच आदींची उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री प्रा. शिंदे म्हणाले की, गेल्या दोन वर्षात झालेल्या चांगल्या पावसामुळे आणि जलयुक्त शिवार अभियानाच्या चांगल्या अंमलबजावणीमुळे पाणीटंचाईची तीव्रता जाणवली नाही. मागील वर्षी तर एकही टँकर गरज पडली नाही. त्यामुळे टंचाई परिस्थिती जाणवली नाही. कर्जत तालुक्यात खरीप क्षेत्रात 20 हजार हेक्टरहून 48 हजार 570 हेक्टरपर्यंत वाढ झाली. मका, कापूस, उडीद, मूग पीक पेरणी क्षेत्रात वाढ झाली. याशिवाय, सध्या तालुक्यात पुरेशे बी-बियाणे, खते आणि कीटकनाशके उपलब्ध असल्याने शेतकर्‍यांनी काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकर्‍यांना मृद आरोग्य पत्रिका वाटप करण्याचे काम चांगल्या पद्धतीने झाले आहे. मात्र, कृषी सहाय्यकांनी त्यानुसार शेतकर्‍यांना त्यांच्या जमिनीची प्रतवारी समजावून सांगून कोणत्या प्रकारची पीके घेणे आवश्यक आहे, याचे मार्गदर्शन करणे गरजेचे असल्याचे सांगून पालकमंत्री प्रा. शिंदे यांनी त्यासाठी कृषी यंत्रणेने मोहीमच हाती घेण्याची सूचना केली.
जामखेड तालुक्यात विविध योजनांच्या संदर्भात चांगले काम झाले आहे. लक्षांकापेक्षा अधिक काम कृषी यंत्रणेने केले आहे. यावर्षीही हीच अपेक्षा प्रत्येक यंत्रणेकडून असून नागरिकांनीही शासकीय योजनांची माहिती घेऊन या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
गटविकास अधिकार्‍यांनी टंचाई आराखड्यात नमूद बाबी तात्काळ पूर्ण करुन घ्याव्यात. त्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये समन्वय ठेवावा, अशा सूचना त्यांनी केल्या. महावितरणनेही या काळात शेतकर्‍यांना जास्त त्रास होणार नाही. वीजपुरवठा नियमित आणि सुरळित राहील, यासाठी दक्षता घेण्याचे निर्देश प्रा. शिंदे यांनी दिले. यावर्षीही भरपूर पाऊसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे कर्जत आणि जामखेड येथील जलयुक्त शिवार अभियानाची कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना ना. राम शिंदे यांनी दिल्या.