Breaking News

कामगारदिनी कर्मचार्‍यांचा सरकारविरोधात हल्लाबोल

मुंबई : केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा कडाडून विरोध करण्यासाठी राज्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगार संघटनांनी सरकारविरोधात हल्लाबोल पुकारला आहे. 1 मे या महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगारदिनी राज्यातील लाखो कामगार सरकारच्या विरोधात इशारा मोर्चा काढणार असल्याचा इशारा गुरूवारी राज्य कामगार संघटना संयुक्त कृती समितीने दिला. या इशारा मोर्चात राज्यातील शेकडो कामगार सहभागी होणार आहेत.

या इशारा मोर्चाची सुरुवात सकाळी 10 वाजता हुतात्मा स्मारकापासून होऊन आझाद मैदानात समारोप होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकारने देशातील कामागारांच्या विरोधात कायदे आणून व काही कायदे बदलून कामगार वर्गाला उद्ध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नसल्याने नवीन रोजगार निर्माण होऊ शकले नाहीत. तर, आहेत त्या ठिकाणी लोकहिताच्या प्रकल्पाचे खासगीकरण केले जात आहे. 
सरकारी कार्यालयात कामगार कपात करून अनेक भागाचे कंत्राटीकरण केले जात आहे. यामुळे शिक्षण, आरोग्य आदी क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांना देशोधडीला लावले जात आहे. नफ्यात चालणार्‍या बँका या तोट्यात आणल्या जात आहेत. आज देशात 16 लाख कोटी थकीत व बुडीत कर्जाच्या ओझ्याखाली बँका आणून त्या तोट्यात आणल्या गेल्या आहेत. यामुळे या क्षेत्रात कार्यरत असलेल्या शेकडो कामगारांवर बेरोजगारीची वेळ येणार असल्याने त्याविरोधात विविध कामगार संघटनांचे प्रतिनिधी कामगार सरकारविरोधात हल्लाबोल करत हा इशारा मोर्चा काढणार असल्याची माहिती संयुक्त कृती समितीचे सहनिमंत्रक कॉ. विश्‍वास उटगी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या इशारा मोर्चात सर्व कामगारांना दरमहा 18 हजार रुपये किमान वेतन द्या, वाढती महागाई तात्काळ रोखा, कंत्राटी पद्धत बंद करून समान काम समान वेतन द्या, देशात नोकर्‍यांची उपलब्धता वाढवा, सार्वजनिक धंद्यांचे खासगीकरण बंद करा, कामगार कायद्यातील प्रस्थापित कामगार विरोधी बदल रद्द करा, आदी अनेक मागण्या केल्या जाणार आहेत. 
या इशारा मोर्चात आयटक, इंटक, हिंदू मजदूर सभा, एनटियुआयसारख्या 11 केंद्रीय संघटना तसेच बँक, विमा, पोर्ट ट्रस्ट, महापालिका कामगार, बेस्ट, एसटी कामगार, शिक्षक, प्राध्यापक, सरकारी कर्मचारी अशा 35 हून अधिक संघटना आणि त्यांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.