Breaking News

देशातील न्यायव्यवस्था धोक्यात ? काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप :

नवी दिल्ली : काँगे्रससह विरोधकांकडून महाभियोगाच्या प्रस्तावाची नोटीस राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी फेटाळल्यानंतर देखील न्यायव्यवस्थेचा पेच सुटण्याची चिन्हे नाहीत. गुरूवारी काँगे्रसचे नेते कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकार न्यायव्यवस्थेत आपली खास माणसे पेरत असल्याचा गंभीर आरोप केला. केंद्र सरकार न्यायव्यवस्थेत माणसे पेरत असल्यामुळे देशातील न्यायव्यवस्था धोक्यात आल्याचा आरोप देखील सिब्बल यांनी केला. 

उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश केएम जोसेफ यांच्या नियुक्तीची शिफारस नाकारण्याचा केंद्र सरकारचा निर्णय हा त्याचेच प्रतिक असल्याचा आरोपही सिब्बल यांनी केला. जस्टिस केएम जोसेफ यांनी उत्तराखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळेच त्यांना डावलण्यात आले असा आरोपही त्यांनी केला. सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासाठीच्या कॉलेजीयम पद्धतीनुसार जोसेफ आणि ज्येष्ठ वकील इंदू मल्होत्रा यांच्या नावाची शिफारस करण्यात आली होती. मात्र केंद्र सरकारने मल्होत्रांच्या नावाला मंजूरी दिली तर जोसेफ यांचे नाव फेरविचारासाठी पाठवून दिले.