Breaking News

शेतकऱ्यांना पीककर्ज नाकारु नका जिल्हाधिकारी द्विवेदी यांचे बॅंकांना स्पष्ट निर्देश


जिल्ह्यातील प्रत्येक बॅंकांनी खरीप हंगामासाठी पीककर्ज मागण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना कर्ज द्यावे. बॅंकांनी त्यांच्या सर्व शाखांना तसे निर्देश द्यावेत. पीककर्जापासून कोणताही गरजू शेतकरी वंचित राहणार नाही, याची काळजी बॅंकांनी घ्यावी. पीककर्ज वाटपात बॅंकांनी त्यांची कामगिरी सुधारावी, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी आज दिल्या.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आज (गुरुवारी) खरीप पीककर्ज वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वजीत माने, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक राकेश पांगत, जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी गौरव कुमार, जिल्हा उपनिबंधक (सहकार) अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक परिक्षित यादव, सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाचे उदय सालियन आदींची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी यांनी, बॅंकनिहाय खरीप कर्ज वाटपाचा आढावा घेतला. आतापर्यंत पीककर्ज वाटपात बॅंकानी समाधानकारक कामगिरी केलेली नाही. वास्तविक शेतकऱ्यांना खरीप हंगामापूर्वी खते, बी-बियाणे, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असते. त्यामुळेच वेळेवर कर्ज मिळाले तर त्याचा लाभ शेतकऱ्यांना होतो. मात्र, बॅंका नेमक्या या काळातच उदासीन असल्याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. बॅंकांनी मे अखेरपर्यंत त्यांच्या कर्जवाटपात लक्षणीय सुधारणा करुन त्यांना देण्यात आलेले उद्दिष्ट्याच्या पूर्तीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

नागरी भागातील काही बॅंका अथवा काही व्यापारी बॅंका शेतकऱ्यांना कर्ज नाकारतात. मात्र, शेतकऱ्यांना त्यांच्या नजिकत्या बॅंकेत पीककर्ज मिळाले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्ज नाकारु नका, अशा स्पष्ट सूचना देऊन जिल्हाधिकारी श्री. द्विवेदी म्हणाले की, वास्तविक शेतकऱ्यांचे अर्ज आले की, त्यावर लगेच कार्यवाही करा. शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यासंदर्भात बॅंकांनी त्यांच्या सर्व शाखांना सूचना देऊन त्याप्रमाणे मोहीम राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांनी बॅंकापर्यंत येण्याची वाट पाहाण्यापेक्षा बॅंकांनी सकारात्मक भूमिका घेऊन अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे, असे त्यांनी सांगितले.

ज्या बॅंका पीक कर्ज वाटपात चांगली कामगिरी करतील त्याची दखल जिल्हा प्रशासन निश्चितपणे घेईल, असे सांगून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना आणि विविध महामंडळांच्या अनुषंगिक योजनांच्या बाबतीत बॅंकांनी कोणत्याही प्रकारची अडवणूक करता कामा नये, असे त्यांनी स्पष्टपणे बजावले. यासंदर्भात, सविस्तर आढावा लवकरच घेऊ, असे त्यांनी बॅंक प्रतिनिधींना सांगितले.

नाबार्डचे श्री. पांगत आणि अग्रणी बॅंक अधिकारी श्री. कुमार यांनी बॅंकांना ठरवून देण्यात आलेले पीककर्जाचे उद्दिष्ट्य आणि त्यांची आतापर्यंतची कामगिरी याचे सादरीकरण केले.