Breaking News

लोकशाही मूल्य व आंबेडकरांचे तत्वज्ञान समाजात रुजविणे काळाची गरज


कोल्हार : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे लोकशाही चे महान उपासक होते. भारतीय लोकशाही बलशाली झाल्याशिवाय भारतीय समाज आणि राष्ट्र बलशाली होणार नाही. त्यासाठी लोकशाही मूल्य व आंबेडकरांचे तत्वज्ञान समाजात रुजविणे काळाची गरज आहे. असे प्रतिपादन मराठी विभाग प्रमुख डॉ. राजेंद्र वडमारे यांनी केले. ते प्रवरा ग्रामीण संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंती समारंभी प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य, डॉ. संपतराव वाळूंज होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. अशोक बिडगरयांनी केले. डॉ वडमारे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे संपूर्ण जगात केवळ एक व्यक्ती म्हणून नव्हे तर एक विचारधारा म्हणून मान्यता मिळालेले व्यक्तित्व आहे. डॉ. आंबेडकरांनी समस्त जगभरातील शोषितांना “ शिका, संघटीत व्हा आणि संगर्ष करा” हा जगण्याचा मूलमंत्र दिला. परंतु त्यांचे विचार आजही समाजाच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले नाही. ही बाब गंभीर आहे.प्राचार्य वाळूंज म्हणाले महापुरुष आणि थोरांच्या जयंत्या आणि पुण्यतिथी साजरया करण्यामागचा मुख्य उद्द्येश विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची आणि कार्याची जाणीव व्हावी. त्यांचे विचार आजच्या पिढीने अंगिकारले तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील भारत निर्माण होण्यास वेळ लागणार नाही. जगात सर्वात आदर्श असलेल्या भारतीय संविधानाचे (घटना) शिल्पकार आणि करोडो वंचित,दलितांचे, शोषितांचे उद्धारक असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी फुले, शाहू, संत कबीर यांना आपले गुरु मानून सतत संघर्षावर मात करीत समाजात स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय यासारख्या मुल्यांची बीजे संविधानाच्या माध्यमातून पेरली. विद्यार्थ्यांनी आणि आजच्या पिढीने डॉ. बाबासाहेबांच्या आंबेडकरांच्या विचार आणि तत्वज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. यावेळी कु. हर्षदा मुसळे हिने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनादर्श आणि कार्य याचा आपल्या मनोगतात आढावा घेतला. आज अनेक राष्ट्रांनी आपल्या लोकशाही प्रणालीचा स्वीकार करून आपल्या मध्ये अमुलाग्र बदल केला आहे. परंतु आपल्याला राज्यघटना आणि लोकशाही रुपी अमुल्य ठेवा मिळून ही आपल्या देशामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकराना अपेक्षित बदल झालेला नाही. याचा विचार आजच्या युवकांनी करण्याची गरज आहे. याप्रसंगी उपप्राचार्य अनिल लांडगे, डॉ. अर्चना विखे, डॉ. भाऊसाहेब नवले, डॉ. प्रवीण तुपे, प्रा.राकेश माळी, प्रा. अमोल खर्डे, प्रा. आदिनाथ दरंदले, प्रा. विजय दिघे, डॉ. विजय खर्डे, डॉ. परमेश्वर विखे, डॉ. सोपान डाळिंबे,प्रा. विनोद कडू, दीपक भाने, अनिल आहेर, प्रा. असिफ पठाण, प्रकाश पुलाटे, प्रा. अर्चन गीते, प्रा. राणी गायकवाड, प्रा. अमृता म्हस्के, प्रा. कविता राउत भानुदास कदम, निलेश लोखंडे, शरद घोलप, सखाराम जेजुरकर, राजू कदम, व मोठ्या संख्येने विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थिती होते. आभार श्री. विजय भोसले यांनी मानले. सूत्रसंचालन डॉ. प्रतिभा विखे यांनी केले.