Breaking News

वाळू तस्कराला एक वर्ष सक्तमजुरी

राहाता प्रतिनिधी - वाळू तस्करी करणार्‍या बाळासाहेब रावसाहेब वडीतके {रा. पिंपळगाव फुणगी, ता. राहुरी} या आरोपीस राहाता न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी व एक हजार रुपये दडांची शिक्षा ठोठावली. न्यायाधीश श्रीमती एस. बी. नाईकनवरे (गरड) यांनी हा आदेश दिला.

दि. २० ऑगस्ट २०१२ रोजी सायंकाळी प्रवरा नदीतील वाळू चोरून बेकायदा विनापरवाना माल ट्रकमध्ये भरून ती कोल्हारकडून बाभळेश्वरच्या दिशेने जात असल्याची खबर लोणी पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल राजेंद्र दरंदले यांना मिळाली होती. त्यानंतर त्यांनी तात्काळ सरकारी जीपमध्ये पोलीस पोलीस कर्मचाऱ्यासह बाभळेश्वर चौकात येत मालट्रक {क्र. एम. एच ११ एम ५१४५ } च्या ट्रक चालकाला गाडी थांबविण्याचा इशारा केला. मात्र त्याने ट्रक न थांबवता भरधाव वेगात शिर्डीच्या दिशेने निघून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून बाभळेश्वर गावाच्या शिवारात नगर-मनमाड रोडवर असलेल्या एका हॉटेलजवळ थांबविले. मात्र ट्रक सोडून पळून गेला. पोलीसांत गुन्हा दाखल होऊन सबंधित खटला राहाता न्यायालयात चालला. सरकार पक्षाच्यावतीने विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता शिवाजी आर. गुळवे यांनी एकूण पाच साक्षीदार तपासले. समोर आलेला सबळ पुरावा व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून राहाता न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस. बी. नाईकनवरे- गरड मॅडम यांनी आरोपीला स भादंवि कलम ३७९ प्रमाणे १ वर्ष सक्तमजुरी व १ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.