Breaking News

तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश : साखर आयुक्त


पुणे : शेतकर्यांच्या उसाची रास्त आणि किफायतशीर किंमत तथा एफआरपीची रक्कम थकित ठेवल्याप्रकरणी साखर आयुक्त संभाजी कडु पाटील यांनी तीन साखर कारखान्यांवर जप्तीचे आदेश दिले आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील भीमा पाटस सहकारी, सातारा जिल्ह्यातील न्यु फलटण शुगर्स खासगी आणि बीड जिल्ह्यातील जयभवानी सहकारी साखर कारखान्याचा समावेश आहे. या तीन कारखान्यांनी मिळून शेतकर्यांच्या एफआरपीची 158 कोटी 97 लाख 56 हजार इतकी रक्कम थकित ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याने 2017- 18 च्या गाळप हंगामात 31 मार्चअखेर 3 लाख 90 हजार 290 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तसेच 15 एप्रिलअखेरच्या देय बाकी अहवालानुसार निव्वळ एफआरपीप्रमाणे ऊस पुरवठादारांचे 54 कोटी 45 लाख 50 हजार रुपये थकित ठेवलेले आहेत. 
फलटण तालुक्यातील न्यू फलटण शुगर्स या खासगी कारखान्याने हंगाम 2017-18 मध्ये 2 लाख 83 हजार 457 टन उसाचे गाळप केले. 15 एप्रिलअखेरच्या अहवालानुसार शेतकर्यांच्या उसाचे 47 कोटी 86 लाख 98 हजार रुपये थकित ठेवले आहेत. गेवराई तालुक्यातील जयभवानी सहकारी साखर कारखान्याने हंगाम 2017-18 मध्ये 3 लाख 63 हजार 531 टन उसाचे गाळप पूर्ण केले आहे. तर 15 एप्रिलअखेरच्या अहवालानुसार 56 कोटी 65 लाख 8 हजार रुपये इतकी एफआरपीची रक्कम थ कित आहे.