धन -दौलत कमवण्यापेक्षा मुलांना चांगले संस्कार द्या- पन्हाळकर महाराज
कुकाणा - प्रत्येक माता-पित्यांनी आपल्या मुलांसाठी खूप धन -दौलत कमवून ठेवण्यापेक्षा त्यांना चांगल्या संस्काराने घडवून मोठे केले तर तुम्हाला म्हातारपणी चांगले दिवस येतील असे प्रतिपादन रामायणाचार्य भाऊसाहेब महाराज पन्हाळकर यांनी केले. नेवासा तालुक्यातील आदर्श वडूले येथील आयोजित अखंड हरिनाम सप्ताह सांगता सोहळ्यात काल्याच्या कीर्तन प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा नियोयन समिती सदस्य तथा वडुले सेवा संस्थेचे अध्यक्ष दिनकर गर्जे, ज्ञानेश्वर कारखान्याचे माजी संचालक सखाराम लोढे, भगवान महाराज चन्ने, सरपंच आशाताई गर्जे, राजहंस महाराज खाटीक, बन्सी महाराज गर्जे, संतोष महाराज खाटीक, नानासाहेब लोंढे, रोहिदास शिरसाठ यांच्या सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. भाजपाचे सचिन देसरडा, दीपा देसरडा , चिलेखनवाडीच्या सरपंच संगिता सावंत व संजय सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहन करून रामनवमी पासुन या सप्ताहास प्रारंभ झाला. या सप्ताह काळात कथा प्रवक्ते गोकुळ महाराज खलाटे यांच्या संतकथेचा भाविकांनी लाभ घेतला.
एकनाथ महाराज नरवडे यांचे रामनवमी निमीत्ताने कीर्तन तर हनुमान जन्मोत्सव सोहळया प्रसंगी योगी दिपकनाथ महाराज यांचे कीर्तन झाले. पन्हाळकर महाराज यांनी सांगितले की, माणसाच्या हातुन नकळत एखादी चूक झालीच तर ती चूक काल्याच्या कीर्तनाने माफ होते. शांतपणे जो परमार्थ करतो त्यालाच काल्याचा प्रसाद मिळतो. काम करा पण राम म्हणा, संपत्तीपेक्षा आपल्या मुलांना महत्व दया. त्यांनाच चांगले संस्कार दया. जीवनात प्रत्येकाने श्रीरामाचे चरित्र आचरणात आणावे. यावेळी आदर्श वडुले ग्रामस्थ व परीसरातील भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. दिगंबर गर्जे व काकासाहेब गर्जे यांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.