दिव्यांग व्यक्तींना मतदानासाठी निवडणूक आयोग सुविधा पुरविणार
भारत सरकारच्या निवडणूक आयोगाने 2018 हे वर्षे सुलभ निवडणूका म्हणून घोषित केले आहे. तसेच कोणताही मतदार मतदान प्रक्रियेपासून मागे राहू नये. यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या प्रमुख उद्दिष्टांच्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी करणे, त्यांना मतदानासाठी प्रोत्साहन देणे आणि त्यांना मतदान प्रक्रिया सुलभ करणे व त्यांच्या अडचणी दूर करणे हा दृष्टिकोन समोर ठेवून या विषयाच्या अनुषंगाने दिव्यांग व्यक्तींना सोयी व सुविधा पुरविण्याबाबत नियोजन, अंमलबजावणी बाबत चर्चा व मूल्यमापन या बाबत बुधवार दि.28 मार्च 2018 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गणेश निर्हाळी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय चर्चासत्र संपन्न झाले. अशी माहिती दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव राजेंद्र लाड यांनी दिली.
जिल्हा पातळीवर दिव्यांग व्यक्ती किती आहेत, त्यापैकी किती मतदार आहेत याबाबतीत माहिती घेण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. तसेच जिल्हा पातळीवर समिती स्थापन करुन दिव्यांग व्यक्तींसाठी काम करणार्या सर्व संघटना, सामाजिक संस्थांना बोलावून दिव्यांगांची मतदार नोंदणी व मतदान करणे याबाबतच्या अडचणीबाबत चर्चा करण्याचेही निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे दिव्यांग व्यक्तींची मतदार नोंदणी व मतदार नोंदणी झालेल्या दिव्यांग व्यक्तींचे 100% मतदान व्हावे याबाबत येणार्या अडचणी व त्यावर उपाय याबाबत चर्चासत्र संपन्न झाले.याप्रसंगी दिव्यांग कर्मचारी संघटनेच्या वतीने बी.एल.ओ.अपंगांच्या दारी, 80% पेक्षा जास्त असलेल्या दिव्यांग व्यक्तींना पोस्टल मतदानाचा लाभ द्यावा, मतदान दिवशी शासकीय मोबाईल व्हँन उपलब्ध करुन द्यावी, तसेच मतदान केंद्रावर व्हीलचिअर, ट्रायसिकल याची व्यवस्था करावी तसेच रँम्पची सुविधा उपलब्ध करावी,वाचादोष असणार्या दिव्यांग बांधवांसाठी वाचाशास्र तज्ञांची नेमणूक करावी, अंध दिव्यांग बांधवांसाठी मदतनिस असावा व ब्रेल लिपीतून मतदान सुवधा देण्यात यावी तसेच 18 वर्ष पूर्ण झालेल्या दिव्यांग बांधवांची नोंदणी होण्यासाठी जास्तीत जास्त प्रचार व प्रसार व्हावा यासाठी मोक्याच्या ठिकाणी बँनर लावावेत आदी मागण्या निवडणूक आयोगाकडे जिल्हाधिकारी बीड मार्फत राज्यउपाध्यक्ष अशोक आठवले,जिल्हाध्यक्ष महादेव सरवदे,जिल्हा सचिव राजेंद्र लाड यांनी केल्या आहेत.
याप्रसंगी जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक व समाजकल्याण विभागाने त्यांच्याकडील उपलब्ध असलेल्या 18 वर्षावरील दिव्यांगांची यादी तात्काळ जिल्हाधिकारी कार्यालयास देणे, समाजकल्याण विभागाने दिव्यांग मतदारांना मतदानासाठी व्हीलचिअर, ट्रायसिकल आदी सुविधा पुरविणे तसेच मतदान केंद्राच्या आवारात जाण्यासाठी मोठे गेट, रँम्पची सुविधा पुरविण्याचे काम बांधकाम विभागाने करावे, शिक्षण विभागाने दिव्यांग विद्यार्थ्यांना सदर कार्यक्रमा विषयी माहिती देवून जनजागृती करावी, सर्व दिव्यांग संघटनेने,नेहरु युवा केंद्र,एनएसएस,एनसीसी इ.संघटनांनी दिव्यांग मतदारांच्या जनजागृतीसाठी मोहिम हाती घ्यावी असे आवाहन करण्यात आले. या चर्चासत्रास बीड जिल्ह्यातील सर्व तालुकास्तरीय निवडणूक विभागाचे नायब तहसिलदार,अंबाजोगाई उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी,जिल्हा शल्यचिकित्सक, समाजकल्याण,सार्वजनिक बांधकाम, शिक्षण विभागाचे अधिकारी,सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व सर्व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी,जिल्हा निवडणूक विभागाचे श्रीकांत रत्नपारखी,राहूल सबे उपस्थित होते असे शेवटी राजेंद्र लाड यांनी म्हटले आहे.