Breaking News

‘बोगस’ शाळांच्या वाढत्या संख्येने शिक्षण विभाग त्रस्त पुन्हा नोटीस बजावण्याची तयारी

मुंबई : महापालिका क्षेत्राच्या हद्दीत मागील काही वर्षांत शिक्षण विभागाची मान्यता न घेताच तब्बल 216 हुन जास्त प्राथमिक शाळा अनधिकृतरित्या सुरू आहेत. या शाळांना क ोणत्याही प्रकारची मान्यता नसून, त्या बोगस असल्याची माहिती महापालिका शिक्षण विभागाकडून दिली जात आहे. या शाळांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या बोगस शाळांच्या संख्येने शिक्षण विभाग त्रस्त झाला आहे. नोटीसा बजावल्यानंतरही या अनधिकृत शाळा आजतागायत सुरू आहेत. शिक्षण विभागाने शाळा आणि त्यांच्या पत्त्यांसह जाहिरात करून यात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेऊ नये, असे आवाहन केले आहे. मात्र, त्यानंतरही या शाळांमध्ये मोठया प्रमाणात प्रवेश सुरू असल्याने येत्या दोन दिवसांत या अनधिकृत शाळांना आम्ही पुन्हा एकदा नोटीस बजावणार आहोत, अशी माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

मुंबईत अनधिकृतरित्या चालविण्यात येत असलेल्या शाळांमध्ये अनेक नामवंत संस्थांच्या शाळांचा समावेश आहे. काही ठिकाणी नव्याने या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक 44 शाळा या कुर्ला, मानखुर्द, गोवंडी, शिवाजीनगर, एम पूर्व या वार्डात चालवल्या जात आहेत. त्या खालोखाल या अनधिकृत शाळा घाटकोपर एल वार्ड आणि एम पूर्व या वार्डात आहेत. तर सर्वात कमी अनधिकृत शाळा या ए वार्डात आहेत. विक्रोळी, भांडुप, बोरिवली, दहिसर, जोगेश्‍वरी, मुलुंड, गोरेगाव, अंधेरी, वडाळा, धारावी, माहीम, रे रोड, माझगाव, नायगाव, दादर, भायखळा, डोंगरी या भागातही या बोगस शाळा सर्रासपणे सुरू आहेत. या शाळांमध्ये प्रवेश घेणार्‍या मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी पुन्हा नोटिस बजावली जाणार असल्याची माहिती शिक्षणाधिकारी पालकर यांनी दिली आहे.