Breaking News

अवैध दारु धंद्यांवर पोलिसांचे छापे


राहुरी प्रतिनिधी - तालुक्यात वांबोरी, देवळाली, रेल्वे स्टेशन या ठिकाणी अवैध दारु विक्री करणारया हाॅटेल धाब्यावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत तीन जणांना रंगेहाथ पकडण्यात आले. या कारवाईमुळे दारु विक्री करणार्याचे चांगलेच धाबे दणाणले.

यासंदर्भात पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की वांबोरी येथील एका हाॅटेलमध्ये अवैध देशी, विदेशी दारु विक्री केली जात आहे. यावेळी स. फौ जाधव व होमगार्ड गोवर्धन कोबरणे, सतिष सगळगिळे, दिपक जाधव यांना बरोबर घेत या हाॅटेलवर छापा टाकला. यावेळी हाॅटेलातील काउंटरमध्ये देशी आणि विदेशी कंपनीच्या २ हजार ३८० रुपयांच्या दारुच्या बाटल्या हस्तगत करण्यात आल्या. त्याचप्रमाणे या कारवाईत दारु विक्री करणारा अनिल मोतीराम ठाकुर यास रंगेहाथ पकडण्यात आले. पोलिसांनी त्याच्याकडून देशी, विदेशी दारु जप्त केली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात मुंबई पोलिस कायदा ६५ ई प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. 

दरम्यान, पोलिसांनी राहुरी रेल्वे स्टेशन परिसरातील एका हाॅटेलवर मुरली रामपुजारी यादव यास दारु विक्री करतांना रंगेहात पकडले. त्याच्याकडून ८३२ रुपये किंमतीच्या देशी दारुच्या १६ बाटल्या जप्त करण्यात आल्या. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळालीप्रवरा रस्त्यालगतच्या गावातील भिल्लवस्ती येथे बाळासाहेब कोंडीराम गोलवड {रा. आंबी रोड देवळाली} येथे देशी दारुच्या बाटल्या बाळगतांना मिळून आला. त्याच्याकडुन ६७६ रुपये किंमतीची दारु जप्त करण्यात आली. अवैध दारु विक्री करणारयावर पोलिसांनी धडक कारवाई सुरु केल्याने दारुविक्री करणारयांमधे खळबळ उडाली आहे.