दखल - मुख्यमंत्र्यांचं अगाध ज्ञान
न्यूटनच्या नियमांना फिजूल ठरवणारे मंत्री केंद्रात असताना या सरकारकडून फारशी गांभीर्यपूर्वक निर्णय घेेण्याची अपेक्षा करता येणार नाही. इस्त्रोच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी शास्त्रज्ञांच्या कामाचं कौतुक करणं अपेक्षित होतं; परंतु तिथं पंतप्रधान वैज्ञानिकांचं मनोधैर्य खच्ची करणारी विधानं करीत असतील, तर अन्य मंत्र्यांच्या बाष्कळ विधानाला अटकाव कसा करता येईल, हा प्रश्न उरतोच. उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या कार्यक्रमात भारतात अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पूर्वीच होत्या, असं सांगताना पंतप्रधानांनी माणसाच्या चेहर्याच्या जागी हत्तीचा चेहरा कसा बसविला, हे उदाहरण दिलं. त्यांचा संदर्भ गणेशाकडं होता. पुराणकथांना वैज्ञानिक संदर्भ देऊन जगात आपण सर्वश्रेष्ठ असण्याचं सांगताना आपण आपलंच हसू करून घेतो आहोत, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. पुराणकथा आणि विज्ञान यात मूलभूत फरक असतो. कार्यकारणभावाला विज्ञानात महत्त्व असतं. कोणत्याही गोष्टीमागचा कार्यकारणभाव समजल्याशिवाय विज्ञान ते मान्य करीत नाही. सामान्य माणसांना जी बाब कळते, ती पंतप्रधान व अन्य मंत्र्यांना कळत नाही, असं म्हणता येत नाही; परंतु ठरावीक विचारसरणीचा पुरस्कार करणार्याांच्या डोळ्यांवर झापडं आलेलं असतं.
त्रिपुरा हे पूर्वांचलातील एक राज्य. गेली 25 वर्षे तिथं डाव्यांची सत्ता होती. डावे तसे कर्मठ. त्यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन होता. डाव्यांकडून उजव्यांकडं सत्ता आल्यानंतर लगेच तिथं वेगळे विचार मांडायला सुरुवात झाली. त्यालाही हरकत घेण्याचं कारण नाही; परंतु आपल्या विचाराचं हसू तर होणार नाही ना, याची दक्षता संबंधितांनी घ्यायला हवी. मुख्यमंत्री विप्लवकुमार देव यांनी मात्र तसं कोणतीही दक्षता बाळगली नाही. महाभारत काळात इंटरनेट अस्तित्वात होतं आणि त्या काळातील लोक इंटरनेटचा वापर करत होते,’ असा दावा विप्लव कुमार देव यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. गुवाहाटीत एका सार्वजनिक कार्यक्रमाला संबोधित करताना विप्लव कुमार देव यांनी हे वक्तव्य केलं. महाभारत काळात युद्धात काय होतंय हे संजय धृतराष्ट्राला सांगत होते. याचा अर्थ त्या काळातही टेक्नॉलॉजी होती. इंटरनेट होते. म्हणजे त्या काळातही या देशात इंटरनेट अस्तित्वात होतं,’ असा दावा देव यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या ‘डिजिटल इंडिया’ योजनेचं कौतुक करताना देव यांनी हा दावा केला. मोदी सत्तेत आल्यानंतर फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि ट्विटर सुरू करणं सर्वांना गरजेचं वाटू लागलं. मोदी स्वत: सोशल मीडियावर असतात आणि तुमचा सोशल मीडिया अपडेट का नाही? याची ते इतरांनाही विचारणा करतात,’ असंही त्यांनी सांगितलं. महाभारत काळात इंटरनेट अस्तित्वात असल्याच्या दाव्यावरून देव चांगलेच अडचणीत आले आहेत.
सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा तपासण्यासाठी भरवर्गात शिक्षिकेला चुकीचे प्रश्न विचारुन अकलेचे तारे तोडणारे उत्तराखंडचे शिक्षणमंत्री अरविंद पांडे यांच्यावर सोशल मीडियावर कडाडून टीका झाली. गणित व रसायनशास्त्राशी संबंध नसलेले प्रश्न विचारुन शिक्षिकेलाच दरडावणार्या व धमकी देणार्या या मंत्र्याबाबत शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला असून शिक्षण मंत्र्यांचे अगाध अज्ञान बघून नेटकर्यांनी त्यांची चांगलीच फिरकी घेतली होती. सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा सुमार असल्याच्या तक्रारी येत असल्यानं पांडे यांनी अचानक काही शाळांना भेटी दिल्या. शिक्षणमंत्र्याना शाळेत बघून शिक्षकांची चांगलीच भंबेरी उडाली. त्यानंतर पांडे एका वर्गात गेले व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्याऐवजी त्यांनी विज्ञान शिकवणार्या शिक्षिकेलाच गणिताशी संबंधित प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. आपण विज्ञान शिकवत असल्याचं शि क्षिकेनं सांगताच विज्ञानातही वजाबाकी आणि बेरजेची गणितं असतात, असे पांडेनी तिला दरडावून सांगितलं. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर मीही विज्ञान शिकलो आहे असंही ते म्हणाले. तसेच तुम्ही महिला आहात म्हणून सोडून देतोय, नाहीतर कडक कारवाई केली असती असा धमकीवजा इशारा त्यांनी दिल. हा सगळा प्रकार विद्यार्थ्यांसमोर घडत असल्यानं शिक्षिकेचा हिरमोड झाला नसला, तर नवल. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी पांडे यांच्या अज्ञानावर टीकेची झोड उठवली आहे. तर शिक्षकांनी पांडे यांनी असंबंधित प्रश्न विचारुन शिक्षिकेचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. तसंच शिक्षणमंत्र्यांना शिक्षकांना प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणी दिला असाही सवाल क ाहीजणांनी केला आहे. यावर आपण विज्ञानाचे जाणते असून आपण विचारलेले प्रश्न योग्यच होते असा दावा पांडे यांनी केला होता. एकीकडं ही स्थिती असताना मुुंबईचे माजी पो लिस आयुक्त आणि केंद्रातील मंत्री सिंह यांनीही विज्ञानाला आव्हान देणारी अनेक विधानं केली. त्यामुळं मनुष्यबळविकासमंत्री प्रकाश जावडेकर यांची तारांबळ झाली. त्यांनी सिंह यांची विधानं चुकीची असल्याचं म्हटलं. दोन मंत्र्यांपैकी कुणाचं खरं मानायचं आणि कुणाचं खोटं असा प्रश्न निर्माण होतो.