Breaking News

महाविद्यालयीन विद्यार्थ्याची गळफास घेवून आत्महत्या


जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा येथील महाविद्यालयीन विद्यार्थी शहादेव दत्तू बोबडे (वय वर्ष अंदाजे 22 ) यास पिंपळगावातीलच सुदाम बोराटे यांच्या मुलीच्या मोबाईल नंबर ची कागदी चिठ्ठी मयत महाविद्यालयीन विद्यार्थी शहादेव बोबडे याच्या पॉकेट मध्ये सापडल्याने त्याचा संशय घेऊन त्यास पिंपळगाव आळवा येथील बारवकर वस्ती येथे बोलावून घेऊन त्यास मारहाण केली. या गोष्टीचा अपमान वाटल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी शहादेव बोबडे याने आपल्या राहत्या घरामध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दवी घटना घडली. मयत शहादेव बोबडे यास सुदाम बोराटे व कृष्णा बोराटे यांनीच आत्महत्येस प्रवृत्त केले, अशा आशयाची फिर्याद जामखेड पोलिस स्टेशन येथे समक्ष हजर राहून मयत शहादेव बोबडे यांचे वडील दत्तु भागुजी बोबडे (वय वर्ष 65) यांनी दिली आहे.

या विषयी सविस्तर हकीगत अशी की, दि. 30 रोजी मयत शहादेव बोबडे यास त्याच्या राहत्या घरी असताना सुदाम बापु बोराटे राहणार पिंपळगाव आळवा यांच्या मुलीने स्वतःच्या मोबाईलवर बॅलन्स टाकण्यासाठी मयत शहादेव बोबडे याच्या कडे चिठ्ठी वर नंबर लिहून दिला होता. मयत शहादेव बोबडे याचे पॉकेट दि. 30 रोजी गावात हरवले होते. तेच पॉकेट सुदाम बोराटे यांना सापडले असता, यांना त्यामध्ये आपल्या मुलीच्या मोबाईल नंबरची चिठ्ठी आढळून आल्याने सदरची चिठ्ठी सुदाम बोराटे याने गावातीलच कृष्णा बोराटे यांना दाखविली, मयत शहादेव बोबडे याच्यावर मुलीच्या संदर्भात संशय घेऊन सुदाम बोराटे व कृष्णा बोराटे यांनी मयत शहादेव बोबडे यास बारवकर वस्ती येथे बोलावून शिवीगाळ करून मारहाण केली. 

त्यानंतर मयत शहादेव याने घडलेला प्रकार घरी येऊन सांगितला, त्यावेळी आम्ही घरच्यानी त्यास समजावून सांगितले व विषय सोडून दे असे सांगून आम्ही घरातील काम आटपून कामासाठी राणात गेलो, सायंकाळी सहा वाजता काम उरकुन घरी आल्यानंतर घरात पाहिले असता घरातील पत्र्याच्या लोखंडी अँगलला गळफास घेऊन आत्महत्या करून लटकलेला त्याचा देह दिसला, त्यामुळे आम्ही लगेच जामखेड पोलिस स्टेशनला फोन केला असता, काही वेळातच पोलीस आले व त्यांनी रितसर पंचनामा करून मयत शहादेव याचे प्रेत जामखेड ग्रामीण रुग्णालय येथे शवविच्छेदनासाठी पाठवून, शवविच्छेदनानंतर पुढील अंत्यविधी करिता प्रेत ताब्यात दिले. त्यानंतर मयत शहादेव याचे अंत्यसंस्कार केले असे मयत शहादेव बोबडे यांचे वडील दत्तु बोबडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले असून या संदर्भातील दाखल फिर्यादीप्रमाणे गुन्ह्यातील संबधित आरोपींना ताब्यात घेणे संदर्भात व पुढील तपासात पोलिसांनी दखल घेतली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली जामखेड पोलिस करत आहे.