Breaking News

बिझीनेस फोरम स्थापण्याचा ‘प्रवराईट्स’चा निर्णय : विखे


विविध क्षेत्रात यशस्वी करिअर घडविणा-या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बिझीनेस फोरम स्थापन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय प्रवरा परिवारातील शिक्षण संस्थाच्या प्रवराईट्स या माजी विद्यार्थी संघटनेने घेतला. पुणे येथे विद्यार्थ्यांसाठी प्रवरा भवन उभारण्याची घोषणा प्रवराईट्सचे अध्यक्ष तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. 
प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था, प्रवरा अभिमत विद्यापीठ आणि डॉ. विखे पाटील फौंडेशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने लोणावळा येथे आयोजित केलेल्या दुस-या प्रवरा मेगा अॅल्युमिनी मिट २०१८ या सोहळ्यात शेती, औद्योगिक, प्रशासन, आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या माजी विद्यार्थ्यांनी प्रश्न उत्‍तरांच्या स्वरूपात आपले अनुभव आणि भविष्यातील रोडमॅप यावर संवाद साधला. यातूनच येणा-या काळात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेमधील विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरेल, असे व्यासपीठ तयार करण्याच्या दृष्टीने एकत्र येण्याची भूमिका अनेकांनी मांडली. 

यावेळी माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, डॉ. भास्करराव खर्डे, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र विखे, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे डायरेक्ट जनरल डॉ. सर्जेराव निमसे, डॉ. विखे फोंडेशनचे डायरेक्ट जनरल बी. सदानंद आदींसह तीनही शिक्षण संस्थाचे विश्वस्त, संचालक पदाधिकारी आणि विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी-विद्यार्थीनी याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना राधाकृष्ण विखे म्हणाले की, एक कुटुंब म्हणून आपण सर्वजण एकत्रित आलो आहोत. हा परिवार खूप मोठा आहे. अॅल्युमिनी मिटच्या माध्यमातून शक्य तितक्या माजी विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न केला. भावी पिढीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी जो विचार व्यक्त झाला तो महत्त्वपूर्ण आहे. यासाठी शक्य ते सहकार्य करण्याची ग्वाही देतानाच विखे म्हणाले की, माजी विद्यार्थी मला भेटायला येतात, तेव्हा नवी उर्जा मिळते. पद्मश्री आणि पद्मभूषण खासदार साहेबांच्या दूरदृष्टीने विस्तारलेला हा वटवृक्ष आपल्या सर्वांच्या मार्गदर्शक सहकार्याने बहरत जाणार आहे, असा विश्वास त्यांनी केला. 

प्रवराईट्सच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फी मध्ये सवलत देण्याचा मनोदय व्यक्त करून विखे म्हणाले की, शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन पुणे येथे प्रवरा भवन उभारण्याचा निर्णय घेतला. यावेळी पद्मश्री डाॅ. विठ्ठलराव विखे आणि लोकनेते पद्मभूषण डाॅ. बाळासाहेब विखे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रवरा अभिमत विद्यापीठाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ.राजेंद्र विखे यांनी प्रारंभी प्रवरा परिवाराच्यावतीने स्वागत केले. माजी विद्यार्थी अजय धुमाळ याप्रसंगी आपले अनुभव सांगताना म्हणाले की, हे मोठे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. विविध घटनातून मिळालेली प्रेरणा पुढे घेवून जात राहीलो. विकासाचा रोडमॅप सहकारी चळवळीतून साकार झाला. यातून शिक्षणाची सुविधा ग्रामीण समाजाला मिळाली.

आयपीएस अधिकारी हरिषबैजल म्हणाले की, पद्मभूषण विखे पाटील होते म्हणूनच मी आज आहे. प्रवरा पब्लिक स्कूलमध्ये मिळालेल्या शिक्षणामुळे घडलो, मराठी चांगले बोलण्याची सवय लागली. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल जेव्हा एका व्यासपीठावर येवू तेव्हाच मोठे काम होईल. डाॅक्टर विजय कदम म्हणाले की, प्रवरा परिसर म्हटले की, रोमांच उभे राहातात. आज विविध देशातील परिसंवादात सहभागी होण्याची संधी मिळते, हे भाग्य केवळ प्रवरेच्या मदतीमुळे. प्रवरेच पाणी, माती, सामाजिक विचारांची पायाभरणी ही बाळासाहेब विखे यांच्यामुळे झाली. 

महाराष्ट्राच्या प्रशासनातील र्वैशाली पठारे म्हणाल्या की, स्पर्धा परीक्षांचे बाळकडू प्रवरा कन्या विद्या मंदिरात मिळाले. माणूस म्हणून एक वेगळा ठसा उमटविला तो केवळ प्रवरामध्ये मिळालेल्या शिक्षणामुळेच. याप्रसंगी अनेक माजी विद्यार्थ्‍यांनी विविध सुचना करुन, प्रवरेच्‍या कामात योगदान देण्‍याची ग्‍वाही दिली. यामध्‍ये माजी विद्यार्थींनीही होत्‍या. यावेळी उपस्थित माजी विद्यार्थ्‍यांच्‍यावतीने विरोधी पक्षनेते विखे यांचा सत्‍कार करण्‍यात आला. या पुढील ‘अल्‍युमिनी मिट’ येत्या दि. ७ एप्रिल दिल्‍ली येथे आयोजित केली जाणार आहे.