Breaking News

शिक्षणाबरोबर सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची ः भरत कांत

नगर । प्रतिनिधी - मुलांच्या शिक्षणाबरोबर सार्वजनिक स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे. कंपनीच्या माध्यमातून नेहमीच लोकांच्या उपयुक्त असे उपक्रम हाती घेतले जातात. सार्वजनिक स्वच्छतेमुळे माणसाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामुळे विद्यार्थी देशाचे सक्षम नागरिक होण्यास मदत होईल. त्यांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी सुसज्ज असे स्वच्छतागृह उभारण्यासाठी कमिन्स कंपनीने मदत केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी मांजरसुंबा येथे डिजिटल शाळा निर्माण करून दिली आहे, असे प्रतिपादन कमिन्स कंपनीचे डीजीएम भरत कांत यांनी केले. नगर तालुक्यातील डोंगरगण-मांजरसुंबा येथील गणपतराव मते पाटील विद्यालयासाठी एमआयडीसीतील कमिन्स कंपनीच्या वतीने 11 लाख रुपये खर्चून करण्यात येणार्‍या स्वच्छतागृहाच्या कामाचा प्रारंभ कंपनीचे डीजीएम भरत कांत, जितेंद्र बडगुजर, ज्युनिअर मॅनेजर रुतिका घोरपडे, अंजली मगर यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच जालिंदर कदम, महेश भरडिया, तुकाराम वाखारे, रूपेश सुराणा, मुख्याध्यापक अजय भुतकर, इंद्रभान कदम, तुकाराम कदम, संतोष पटारे, शिवाजी साठे आदी उपस्थित होते. जितेंद्र बडगुजर म्हणाले की, आदर्शगाव मांजरसुंबा येथे कमिन्स कंपनी सार्वजनिक विकासाचे काम करीत असताना मते पाटील विद्यालयास आम्ही सदिच्छा भेट दिली असता, या ठिकाणी स्वच्छतागृह मोडकळीस आलेले निदर्शनास आल्यानंतर वरिष्ठ कंपनीच्या अधिकार्‍यांनी ताबडतोब स्वच्छतागृहाला मंजुरी देऊन कामास सुरुवात केली आहे.