Breaking News

नाणारभोवती फिरणार राज्याचे राजकारण; रिफायनरी विरोधकांची धावाधाव

मुंबई : राजधानी नवी दिल्लीत सौदी अरेबियाच्या कंपनीसोबत नाणार रिफायनरीचा करार झाला. तेव्हापासून रिफायनरीच्या विरोधातील ग्रामस्थ विविध राजकीय नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामुळे आगामी राजकारण नाणारभोवती फिरणार असल्याचे स्पष्ट होत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचीही शुक्रवारी नाणारच्या ग्रामस्थांनी भेट घेतली. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही ग्रामस्थ भेटले. त्याचबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासमोरही नाणारच्या ग्रामस्थांनी आपले गाऱ्हाणे मांडले आहे. केंद्रातील भाजप सरकारने कोणत्याही स्थितीत हा प्रकल्प पूर्णत्वाला नेण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळेच या प्रकल्पाच्या विरोधात असणाऱ्या सत्ताधारी शिवसेनेलाही न जुमानता दिल्लीत गुपचूप करार करण्यात आला. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना त्याबद्दल फितूर असल्याचेही म्हटल्याने या दोन्ही सत्ताधारी पक्षात पुन्हा दरी निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप ठोस भूमिका घेतलेली नाही. येत्या १० मेला ते कोकणचा दौरा करून आपली भूमिका मांडणार आहेत. तर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेने आधीच या आंदोलनाला विरोध जाहीर केला असला तरी सत्तेत असलेल्या शिवसेनेवर आंदोलनाचा विश्वास नाही. त्यामुळे आगामी काळात याच कोकणातील नाणार रिफायनरीवरून राज्यातील राजकारण तापणार, हे स्पष्ट होते.