नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्याशी बोलणे टाळणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवानी यांचा मात्र आदर करताना दिसून आले आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संसद भवनात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी राहुल गांधी अडवाणींचा हात हातात घेवून त्यांना पुढे घेऊन गेले. संसद भवनातील कार्यक्रमाला राष्ट्रपती राम नाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. त्यावेळी राहुल गांधीही त्याठिकाणी उपस्थित होते. अडवाणींचे आगमन होताच राहुल त्यांच्या स्वागतासाठी पुढे गेले. अडवाणींचा एक हात हातात घेवून त्यांना गर्दीतून वाट काढून दिली. यापूर्वीही राहुल यांनी अडवाणींना आदरपूर्वक वागणूक दिल्याचे दिसून आले होते. पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह समोरासमोर आल्यावर राहुल गांधी बोलणे टाळत असल्याचे यापूर्वीच्या घटनांवरून दिसून आले होते. संसदेत एका कार्यक्रमावेळी पंतप्रधान मोदी आणि राहुल एकमेकांकडे रोखून पाहत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.