Breaking News

टीईटी आणखी चार भाषेत ; प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य शासनाला

पुणे : शिक्षकांनी अनिवार्य असलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) आता आणखी चार भाषांमध्ये घेण्यात येणार आहे. ही परीक्षा येत्या जुलै महिन्यात घेण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राज्य शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला आहे. यापूर्वी इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमांतून होणारी टीईटी आता आठ भाषांमध्ये घेतले जाणार आहे. आता गुजराती, तेलगु, हिंदी, कन्नड, सिंध अशा चार प्रादेशिक भाषांमध्ये टीईटी होणार आहे.शाळांमध्ये शिक्षण सेवक किंवा शिक्षक पदावर नियुक्तीसाठी उमेदवारांना टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. शालेय शिक्षण विभागाने शिक्षक होण्यासाठी टीईटी उत्तीर्णतेची अट घातली आहे. त्यानंतर डीएड शिक्षकांना अभियोग्यता आणि बुध्दीमापन चाचणी उत्तीर्ण होणे आवश्‍यक आहे.राज्यात 2013 रोजी पहिल्यांदा टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. त्यानंतर 2014 व 2016 रोजी ही परीक्षा झाली. त्यानंतर गेल्या वर्षी 22 जुलै रोजी परीक्षा घेण्यात आली. त्यानुसार आता ही परीक्षा जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात साधारण 8 जुलै रोजी घेण्याच्या दृष्टीने संभाव्य वेळापत्रक तयार करण्यात आले आहे. यासंदर्भातील बैठका देखील घेण्यात आल्या. या नियोजनाला मान्यता मिळण्यासाठी ते शिक्षण विभागाला पाठविण्यात आले आहे, असे परिषदेच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.