मुंबई-गोवा महामार्गावर सलग दुसर्या दिवशीच्या अपघातात दोन ठार
रत्नागिरी, दि. 30, एप्रिल - रत्नागिरी जिल्ह्यात धामणी (ता. संगमेश्वर) येथे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी सात वाजता ट्रक आणि स्कॉर्पिओ या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात दोन सख्खे भाऊ जागीच ठार झाले. दोघांच्याही पत्नी गंभीर जखमी झाल्या आहेत.
सलग सुट्ट्या आल्यामुळे कोकणात येणा-या पर्यटक तसेच चाकरमान्यांची संख्या कमालीची वाढली आहे. महामार्गावर विविध ठिकाणी चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने वाहतूक कोंडीही होऊ लागली आहे. काल मुंबई-गोवा महामार्गावर खेरशेत येथे दोन महिला व एक बालिका, खेड-भरणे नाका येथे एक बालक, आणि रत्नागिरी-कोल्हापूर मार्गावर साखरपा येथे स्विफ्ट कारच्या अपघातात चार अशा आठ जणांचा एकाच दिवशी अंत झाला. सलग दुस-या दिवशीची सकाळही भीषण अपघाताने सुरू झाली.
मुंबईहून काजिर्डे (ता. राजापूर) येथे निघालेल्या स्कॉर्पिओमध्ये (क्र. एमएच 05 इक्यू 6504) रवींद्र पवार, रसिका पवार, अनिल पवार आणि अपर्णा पवार असे चौघे जण प्रवास करत होते. अ निल पवार गाडी चालवत होते. भरधाव वेगातील स्कार्पिओ संगमेश्वरनजीकच्या धामणी येथे आली असता स्कार्पिओची ट्रकला (क्र. एमएच 08 डब्ल्यू 1414) जोरदार धडक बसल्याने आतील सर्वच प्रवासी रक्तबंबाळ झाले. अपघातस्थळी एकच आरडाओरड सुरू झाली. जवळपासच्या स्थानिक मंडळींनी जखमींना गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली. नरेंद्र महाराज संस्थेची तसेच संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाची रुग्णवाहिकाही अपघातस्थळी दाखल झाली. जखमींना तातडीने संगमेश्वरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच स्कार्पिओचालक रवींद्र आणि अनिल विठोबा पवार हे दोघे सख्खे भाऊ मरण पावल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी घोषित केले .
रवींद्र यांची पत्नी रसिका आणि अनिल यांची पत्नी अपर्णा या दोघी गंभीर जखमी असून त्यांची परिस्थिती अत्यंत नाजूक असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले. त्या दोघींवर प्राथमिक उपचार करून त्यांना अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. महामार्गावर सलग दुसर्या् दिवशी घडलेल्या भीषण अपघातामुळे वाहनचालकांत भीतीचे वातावरण पसरले असून पोलीस प्रशासनाने वाहनावरील वेगावर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन चालकांना केले आहे.