सामुहिक विवाह सोहळ्यात 102 जोडपी झाली विवाहबध्द
गडचिरोली, दि. 30, एप्रिल - मैत्री परिवार संस्था नागपूर, पोलिस अधीक्षक गडचिरोली, जिल्हा पोलिस दल, धर्मदाय आयुक्त नागपूर आणि साईभक्त साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आज गडचिरोली येथील अभिनव लॉन येथे भव्य आयोजित आदिवासी मुला - मुलींच्या सामुहिक विवाह सोहळ्यात 102 आदिवासी जोडपी विवाहबद्ध झाले. या विवाह सोहळ्यात दोन आत्मसमर्पीत नक्षल जोडप्यांचा समावेश आहे.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, मैत्री संस्थेचा उपक्रम स्तुत्य असून जिल्ह्यातील गरीब आदिवासी परिवारातील वधू - वरांचा विवाह लावून दिल्यामुळे त्यांच्या प रिवाराची आर्थिक बचत झाली आहे. गडचिरोली पोलिस दल आणि प्रशासन सुध्दा नेहमीच आदिवासी नागरिकांच्या पाठीशी आहे. नक्षल्यांनीसुध्दा आत्मसमर्पण करून मुख्य प्रवाहात येण्याचा मार्ग स्वीकारला आणि मैत्री परिवाराच्या माध्यमातून त्यांनी आपल्या जोडीदाराची निवड करून संसार थाटण्याचा निर्णय घेतला याबद्दल त्यांचे अभिनंदन करीत असल्याचेही जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले.
यावेळी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख म्हणाले, सर्वांच्या भावनांचा विचार करून विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. आदिवासी रूढी, परंपरा, रितीरिवाजानुसार जोडप्यांचा विवाह लावून देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून जोडपी विवाहसाठी दाखल झाले आहेत. केवळ एका तालुक्यापुरता मर्यादित न ठेवता जिल्हास्तरीय विवाह सोहळा आयोजित करून एक वेगळा उपक्रम मैत्री संस्था, जिल्हा पोलिस विभाग, धर्मदाय आयुक्त कार्यालय आणि श्री साई सेवा समितीने राबविला आहे. विवाहित जोडप्यांना लग्नाव्यतिरिक्त रोजगारसुध्दा उपलब्ध करून दिला जाणार आहे, असेही पोलिस अधीक्षक डॉ. देशमुख म्हणाले.
खा. अशोक नेते यांनी वधू - वरास शुभेच्छा देताना अशाप्रकारच्या सामुहिक विवाह सोहळ्यामुळे जिवघेणा संघर्ष टाळता येवू शकतो. अशा सामुहिक विवाह सोहळ्यांची नितांत गरज असून पालक ांचा वेळ व पैसा बचत होतो. अवाढव्य खर्चातून सुटायचे असेल तर सामुहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करणे गरजेचे असल्याचे म्हणाले.
मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे म्हणाले, या ऐतिहासिक विवाह सोहळ्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनीसुध्दा कौतुक केले आहे. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांनीही विवाहित जोडपी व आत्मसमर्पीत नक्षल जोडप्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भविष्यात संस्थेच्या वतीने असे अनेक सोहळे आयोजित केले जाणार आहेत. आज या विवाहित जोडप्यांची भव्य मिरवणूक क ाढण्यात येणार असून त्यासाठी 30 ट्रॅक्टरची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विवाहित जोडप्यांना 45 हजार रूपयांचे आहेर देण्यात आले आहे. यासोबत सोन्याचे मंगळसूत्र, जोडवी, वस्त्र व वधू - वरांच्या आई - वडीलांनाही कपडे संस्थेच्या वतीने देण्यात आले असल्याचे सांगितले.
आदिवासी विवाह पध्दतीनुसारच सामुहिक विवाह सोहळा पार पाडण्यात आला. विवाह सोहळ्यानंतर वधू - वरांची शिस्तबद्ध पद्धतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आदिवासी रिती रिवाजानुसार व गोंडी भाषेतील मंगलाष्टके म्हणत अक्षतांची उधळण करण्यात आली. सायंकाळी ट्रॅक्टरवरून सर्व विवाहित जोडप्यांची विवाह स्थळापासून वाजत - गाजत मिरवणूक काढून पाठवणी केली जाणार आहे.
आत्मसर्मीत नक्षल जोडप्यांचे केले मान्यवरांनी अभिनंदन आत्मसमर्पीत नक्षल जोडपी या विवाहातील मुख्य आकर्षण ठरले होते. उपस्थित सर्व मान्यवरांनी आत्मसमर्पीत नक्षल जोडप्यांचे विवाह मंडपात पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. सैनु झुरू वेळदा उर्फ मिरगु (35) आणि रूपी कांडे नरोटी उर्फ झुरी (36) , तसेच अर्जून बारसाय पोया उर्फ नरेश (25) आणि छाया देवू कुळयेटी (23) या आत्मसमर्पीत दाम्पत्याचा विवाह लावण्यात आला. विवाहानंतर मान्यवरांनी या जोडप्यांचे अभिनंदन केले. या दाम्पत्यांनीसुध्दा आत्मसमर्पणामुळे संसार थाटण्याचा आणि रोजगाराचा मार्ग मोकळा झाल्याची भावना व्यक्त करीत इतर नक्षल्यांनीसुध्दा आत्मसमर्पण करावे, अशी इच्छा व्यक्त केली.