Breaking News

आठवडाभर दुधाचे मोफत वाटप करणार


नगर । प्रतिनिधी - सरकारने दुधाला 27 रुपये दर देण्याचे जाहीर केले आहे. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना या दरापेक्षा प्रती लिटर दहा रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळेच ’लुटता कशारा, फुकट न्या’ असा नारा देत शेतकर्‍यांनी आंदोलन पुकारले आहे. याअंतर्गत 3 ते 9 मे दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, शाळा, अनाथालय, अशा विविध ठिकाणी दुधाचे मोफत वाटप करण्यात येणार आहे. शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारातून हे आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती समन्वयक डॉ. अजित नवले यांनी दिली. नगरमध्ये विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक शेतकरी यांची गुरुवारी बैठक झाली. त्यानंतर 3 ते 9 मे असे सलग सात दिवस मोफत दूध वाटप करून सरकारी धोरणांचा निषेध करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत पत्रकार परिषदेत नवले यांनी माहिती दिली. या वेळी धनंजय धोडे, गुलाबराव ढेरे, संतोष वाडेकर, अ‍ॅड. कारभारी गवळी, विश्वनाथ वाघ, संतोष हांडे, अशोक आंधळे, डॉ. संदीप कडलग, अशोक सब्बन, राजेंद्र तुटकणे, अभिजित पाटील आदी उपस्थित होते. शेतकर्‍यांना प्रती लिटर दुधामागे दहा रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने दराबाबत दिलेले आश्वासन फोल ठरले आहे. लाखगंगा (जि. औरंगाबाद) या गावाने ग्रामसभा घेऊन मोफत दूध वाटण्याचा ठराव केला आहे. त्याच पद्धतीने राज्यभर हे आंदोलन छेडले जाणार आहे. त्यासाठी एक मे रोजी प्रत्येक गावातील ग्रामसभेत तसा ठराव केला जाणार आहे.