Breaking News

घराण्यांच्या टोळीयुध्दाचे बळी


कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा जाब विचारून ज्यांच्या हातून सत्ता हिसकावून घेतली त्यांच्याच हातात हात घालून विरोधकांचे मुडदे पाडणार्‍या या सरकारला एकच जाब विचारावा लागेल, आमचे अहमदनगर बिहारमध्ये आहे का? दोन शिवसैनिकांच्या निर्घृण हत्याकांडानंतर शहरच नाही तर जिल्ह्यातील प्रत्येकाच्या मनात हीच दहशत आणि हाच भितीदायक सवाल आहे. अपवाद फक्त दौरा रद्द करणारे मुख्यमंत्री आणि शिर्डीत मालपाणींचा पाहुणचार घेणार्‍या पालकमंत्र्यांचा.
अहमदनगर... निजामाच्या संहारी अत्याचाराला मुठमाती देण्यासाठी तलवारी तळपवणार्‍या मनगटांची भुमी, इंग्रजांच्या जुलमी राजवटी विरूध्द संघर्षात संसाराची होळी करणार्‍या क्रांतीकारकांची भुमी, स्वातंत्र्यानंतर प्रत्येक अन्यायाविरूध्द पेटून उठणार्‍या पुरोगामी कार्यकर्त्यांचे मोहोळ असणारा हा जिल्हा आणि हे शहर या जिल्ह्याचे केंद्रस्थान. आज या शहराला माफिया प्रवृत्तीच्या राजकारणाने वेढले आहे. पक्षीय आणि त्यातल्या त्यात तात्विक अधिष्ठान असलेल्या वैचारिक राजकारणापेक्षा नात्यागोत्याचे खुनशी राजकारण या शहरात प्राधान्याने पोसले जाऊ लागल्याने विकासाची गंगा कोरडी ठाक तर पडलीच शिवाय पुर्वी प्रत्येक चळवळीत अग्रभागी असलेला सामान्य नगरकर राजकारणाच्या मुख्य प्रवाहाबाहेर फेकला गेला.
शहर आणि जिल्ह्याचे राजकारण अकोले पासून जामखेडपर्यंत आणि पारनेर पासून पाथर्डीपर्यत नात्यागोत्याच्या चक्रव्युहात अडकले आहे. हा चक्रव्युह केवळ राजकारणापुरता मर्यादीत राहीला नाही. तर ठिकठिकाणी तालुका पातळीवर सुरू असलेल्या या नात्या गोत्याच्या राजकारणातून अनिभिषिक्त सम्राट निर्माण झाले. राजकारणातील पक्षीय भाऊबंदकी उध्वस्त करून अनभिषिक्त सम्राटांच्या साम्राजात टोळीचे राजकारण बाळसे धरू लागले. घराण्यांमध्ये बंदिस्त झालेल्या या राजकारणात अन्य घराणेबाह्य कार्यकर्त्याला स्थान नाही. मग तो कितीही निष्ठावंत असला तरीही नाही. त्याने केवळ हुजरेगीरी करायची आणि खुर्च्या लावायच्या.
अशा या जिल्ह्याचे केंद्र असलेल्या नगर शहराची अवस्था सर्व पातळीवर शौचनीय, दयनीय झाली आहे. जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र म्हणून नात्यागोत्याच्या राजकारणाचेही केंद्र. राजकारणातील सर्वच घराण्यांच्या टोळ्या शहरात सक्रीय आहेत. मुंबईतील गँगवारच्याही थोबाडीत मारणारे नगर शहराच्या राजकारणातील घराणेशाही टोळीयुध्द चिंतेचा विषय आहे. या घराण्यांचे हितसंबंध अडचणीत येऊ लागले की टोळी युध्द भडकते, रस्त्यावर येते आणि सामान्य कार्यकर्त्याचा बळी घेऊनच शांत होते, हा अहमदनगरचा इतिहास आहे.
वर्तमानात केडगावला गेलेले दोन बळी याच टोळीयुध्दाचा परिपाक आहे. शिवसैनिक संजय कोतकर आणि वसंत ठुबे या दोघांवर गोळीबार आणि कोयत्याने वार करून जागेवर ठार मारणार्‍या भुतावळी घराणेशाही टोळीशी संबंधित असलेली चर्चा एकूण परिस्थितीवर प्रकाश टाकते.
हा हल्ला कुणी केला ? कुणाच्या सांगण्यावरून केला? पोलीसांना शरण आलेला पहिला आरोपी खरोखर दोषी आहे का? त्याला बळीचा बकरा बनविला गेला? या वादात पडायचे नाही. ते पोलीस शोधून काढतील. मात्र त्यानंतर जिल्ह्यात आणि शहरात ज्या घडामोडी घडल्या त्या भविष्यातील राजकारणाच्या दृष्टीने अतिशय चितेंच्या आहेत. गत काही घडामोडींचाही मागोवा या निमित्ताने चर्चेतून घेतला जाऊ लागला आहे. या घटनेनंतर जिल्ह्यातच नव्हे महाराष्ट्राच्या राजकारणात एक वेगळी चर्चा आहे. जी पुन्हा नात्यागोत्याच्या राजकारणावर येऊन विसावते. या हल्याच्या निमित्ताने काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपा यांच्या स्थानिक नेत्यांच्या नातेसंबंध पुन्हा उजागर झाले असून पक्षीय मर्यादा ओलांडून सुरू असलेली घराणेशाही राजकीय गुन्हेगारी पोसत असल्याचा निष्कर्ष काढला जात आहे.
दुर्दैवाची बाब म्हणजे या हल्ल्यात ज्यांचा बळी गेला त्या संजय कोतकर यांनी वयाची चाळीस वर्ष शिवसेनेसाठी संसाराचा पाचोळा केला. त्या राज्य नेतृत्वाला कुठलेच सोयरे सुतक नाही. व्यवस्था तर निर्लज्जच आहे. ही घटना घडण्यापुर्वी निर्माण झालेला तणाव आणि तणावाला कारणीभूत असलेल्या मंडळींची पुर्वपिठीका प्रशासनाने लक्षात घेतली असती तर कदाचित संजय आणि वसंत या दोघा निष्पाप कार्यकर्त्यांचे जीव वाचविता आले असते. पण निर्लज्ज आणि सत्तासुंदरीची बटीक बनलेल्या व्यवस्थेकडून ही अपेक्षा गैरच.
राज्याचे आणि जिल्ह्याचे पालकत्व घेतलेल्या सत्ताधार्‍यांनाही गम ना पस्तावा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्या पक्षाचे आहेत त्या पक्षाला सामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या जीवनमरणाशी सोयरे सुतक उरले नाहीच. अशा घटना त्यांच्यासाठी नवीन थोड्याच आहेत! शिर्डीच्या नियोजित दौर्‍यावर असलेले मुख्यमंत्री नगर शहरात येऊन परिस्थितीचा आढावा घेऊ शकत होते. नव्हे राज्याचा पालक आणि गृहमंत्री म्हणून ती त्यांची नैतिक आणि प्रथम जबाबदारी होती. मात्र दौराच रद्द करून मुख्यमंत्र्यांनी जबाबदारीपासून पळ काढला. त्यांच्या पक्षाचा या हत्याकांडात सहभाग आहे ही चर्चा कारणीभूत असेल कदाचित. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी तर कहरच केला. शहर तणावाच्या आगीत होरपळत असतांना शिर्डीत मालपाणी उद्योगपतीच्या थीमपार्कचा पाहुणचार झोडत आहेत. किती हा बेजबाबदारपणा! या निष्पाप कार्यकर्त्यांना श्रध्दांजली द्यायची असेल तर शहारात आणि जिल्ह्यातही फोफावलेल्या घराण्यांमधील नात्यागोत्याच्या टोळी युध्दाविरूध्द सामान्य जनतेला एकजूटीने मैदानात उतरून रणशिंग फुंकावे लागेल. अन्यथा शहर भकास झालेच आहे, मुडद्यांचे शहर म्हणून नगरची ओळख दुर नाही.