Breaking News

भारतीय जवानांच्या उपकारांची परतफेड शक्य नाही : डॉ. गाडेकर

राहाता प्रतिनिधी  - सीमेवर भारतीय जवान डोळ्यात तेल घालुन आपले कर्तव्य पार पाडत आहे. त्यामुळेच आपण आपल्या घरात रात्री निवांत झोपतो. हे जवान त्यांचे कुटुंब, परीवार, आप्तेष्ट व मित्र यांना सोडुन सहा-सहा महिने सीमेवर आपली ड्युटी करतात. घरातील आनंदाच्या अथवा दुःखांच्या प्रसंगांना सुद्धा त्यांना हजर राहता येत नाही. त्यांच्या उपकाराची परतफेड आपण कधीच करु शकत नाही, असे प्रतिपादन भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस व धन्वंतरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ.स्वाधीन गाडेकर यांनी केले.

राहाता गावचे सुपुत्र हवालदार संदिप चांगदेव जेजुरकर हे नुकतेच भारतीय सैन्य दलातील आपल्या २२ वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले. त्याबद्दल त्यांचा डॉ.के.वाय गाडेकर धन्वंतरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने भारत मातेची प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संस्थेचे चेअरमन डॉ.स्वाधीन गाडेकर बोलत होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष यशवंतराव मेहेत्रे, राहाता बाजार समितीचे संचालक भाऊसाहेब जेजुरकर, न.पा. वाडी ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय जाधव, इंद्रभान मोरे, संदिप मेहेत्रे, मनिष चितळकर, कैलास मेहेत्रे, संस्थेचे व्यवस्थापक अरुण मेहेत्रे, अनिल रणमाळे, रमेश काळोखे, संस्थेचे अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते.

यावेळी सत्काराला उत्तर देतांना संदिप जेजुरकर यांनी सांगितले की, सैन्य दलातील नोकरी हि अतिशय खडतर असते परंतु भारत मातेची सेवा हेच आमचे ध्येय असल्यामुळे कुठल्याही कठिण प्रसंगाला आम्ही सामोरे जातो. माझा केलेला सत्कार हा निश्चितच माझ्यासारख्या सिमेवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांना ऊर्जा देईल. तसेच भावी तरुण पिढीत देशसेवेची प्रेरणा जागृत करेल.