Breaking News

‘धनगंगा’ अपहारप्रकरणी घरी राडा

संगमनेर/प्रतिनिधी - तालुक्यातील घुलेवाडी येथील धनगंगा पतसंस्थेतील ३ कोटी ९१ लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी अटकेत असलेल्या संचालक मंडळातील सदस्यांच्या अर्धांगिनिंनी पतसंस्थेचे चेअरमन रंगनाथ काशीद यांच्या घरी जाऊन मारहाण करत शिवीगाळ केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात १४ महिलांसह १६ जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली. या पतसंस्थेत गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेल्या संचालक मंडळातील सदस्य आरोपींना अद्यापपर्यंत जामीन मंजूर झाला नाही. आरोपी संचालक मंडळातील घरच्या महिलांनी काल सकाळी धनगंगा पतसंस्थेचे चेअरमन रंगनाथ काशीद यांच्या घरी जाऊन ठिय्या आंदोलन केले. यावेळी घरात रंगनाथ काशीद यांची सून जयश्री लक्ष्मण काशीद, मुलगा लक्ष्मण रंगनाथ काशीद आणि त्यांची आई यांना तुमच्यामुळे आमचे मालक आज तुरुंगात आहेत. त्यांचा काहीही दोष नसताना त्यांना अटक झाली आहे, असे म्हणत त्यांना मारहाण व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच काशीद यांच्या घरातील महिलांचे दागिने या महिलांनी ओरबाडण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात जयश्री लक्ष्मण काशीद यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला.