Breaking News

मनातील नकारात्मक विचार काढून टाका : पो. नि. जाधव.


कोपरगांव: प्रतिनिधी  - स्पर्धांमधून क्षमता समजतात आणि त्यातूनच करीअर करू शकतो. सुदृढ शरीर आणि सकारात्मक विचार असतील तर शारीरिक अथवा बौध्दिक स्पर्धा जिंकणे सोपे होते. परंतु सध्याचा आहार काही प्रमाणात भेसळयुक्त आहे. त्यामुळे शरीर संपदा योग्य राखण्यासाठी समस्या निर्माण होत आहेत. यासाठी आपले शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी सतत व्यायाम करा, शरीरातून घामाद्वारे विषाणू बाहेर पडतात. आयुष्याकडे सकारात्मकतेने बघा, मनातील नकारात्मक विचार काढून टाका, असा सल्ला कोपरगांव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव यांनी दिला.

येथील संजीवनी के. बी. पी. पाॅलीटेक्निकच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे होते. यावेळी विश्वस्त सुमित कोल्हे, कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती सुनिल देवकर, प्राचार्य ए. आर. मिरीकर आदी उपस्थित होते. यावेळी जाधव यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक, प्रकल्प स्पर्धा, शोधनिबंध स्पर्धा आदी स्पर्धांमध्ये राज्य व विभागीय पातळींवर यश मिळविलेल्या तसेच पाॅलिटेक्निकच्या वेगवेगळ्या विभागांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धांमध्ये यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना रोख स्वरूपाची बक्षिसे, प्रमाणपत्र, सन्माणचिन्ह आदी देऊन गौरविण्यात आले.