Breaking News

सीबीआयकडून चंद्रा कोचर यांच्या पतीची चौकशी

नवी दिल्ली : केंद्रीय अन्वेषन विभागाने (सीबीआय) आयसीआयसीआय बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांचा पती दीपक कोचर यांच्याविरोधात व्हिडिओकॉन कर्ज प्रकरणी प्राथमिक स्तरावरील चौकशी सुरू केली आहे. आयसीआयसीआय बँकेने व्हिडिओकॉनला 3 हजार 250 कोटींचे कर्ज दिले होते, ज्यातील 2 हजार 810 कोटींचे कर्जाची परत फेड झाली नसून ते एनपीए (नॉन परफॉर्मिंग अ‍ॅसेट) म्हणून घोषित करण्यात आल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर आणि व्हिडिओकॉन समुहाचे प्रवर्तक वेणुगोपाल धुत हे अडचणीत आले आहेत. दीपक कोचर यांनी डिसेंबर 2008 मध्ये धुत यांच्यासोबत 50-50 टक्के भागीदारीत नुपॉवर रिन्युबल प्रा. लि. (एनआरपीएल) कंपनीची स्थापना केली. 2009 मध्ये धुत यांनी कंपनीतील संचालक पदाचा राजीनामा दिला व आपल्या वाट्याचे 25 हजार समभाग दीपक कोचर यांच्याकडे हस्तांतरित केले. त्यानंतर 1 वर्षात त्यांची कंपनी सुप्रिम एनर्जी प्रा. लि. ने कोचर यांच्या एनआरपीएलला 64 कोटींचे कर्ज दिले. समभागांचे हस्तांतरण एवढ्यावरच थांबले नाही तर धुत यांचे सहकारी चंद्रा पुंगलिया यांनी देखील आपला सुप्रिम एनर्जीमधील सर्व भाग दीपक कोचर यांच्या पिनॅकल एनर्जीला मात्र 9 लाखात हस्तांतरित केला. त्याच्या 6 महिन्यातच व्हिडिओकॉन समुहाला आयसीआयसीआय बँकेकडून 3 हजार 250 रुपयांचे कर्ज मिळाले. या सर्व घटनाक्रमाने स्वार्थासाठी अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप होत असून चंदा कोचर यांच्या भूमिकेवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहेत. याबाबत वृत्त समोर येताच भारतीय रिझर्व बँकेने आयसीआयसीआय बँकेला नियमांचा भंग केल्याप्रकरणी 58.9 कोटींचा दंड ठोठावला आहे.